
वादग्रस्त पोस्ट अन् १२५ जणांवर गुन्हे दाखल; सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच…
वादग्रस्त पोस्ट अन् १२५ जणांवर गुन्हे दाखल; सायबर पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच…
धाराशिव (प्रतिनिधी) – देश व राज्य पातळीवर विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे. सोशल मीडियात तणाव निर्माण करणाऱ्या प्रक्षोभक पोस्ट व्हायरल झाल्याने दोन गटात राडा होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनाने आता यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सायबर सेलसह पोलिस ठाण्यामधील गोपनीय शाखांमार्फत त्यांच्या हद्दीतील हालचाली, सोशल मीडियातील पोस्ट आदींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलिस दलामार्फत फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप इत्यादी सोशल मीडियावर देखरेख करण्यात येत असुन सर्व सोशल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सामाजिक प्रसार माध्यमांवरुन वादविवाद होईल अशी माहिती प्रसारीत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आपण सर्वांनी जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलिस दलास सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हावासियांना केले आहे. दोन गटांत झालेल्या राड्यात पाच जण जखमी झाल्याची घटना धाराशिवमध्ये घडली. अज्ञात कारणाने दोन गट आमने-सामने आल्यानंतर दगडफेक झाली, खाजा नगर व गणेश नगर भागात हा प्रकार घडला होता.


मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव मध्ये दोन गटातील राडा प्रकरणी पोलिसांनी १२५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक देखील केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी एका यू ट्यूब चॅनलच्या पत्रकाराला देखील अटक केली आहे. त्याच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप असून, अल्ताफ शेख असे त्याचे नाव आहे. धाराशिव शहरात सोमवारी रात्री दोन गटात वाद झाला. वादाचे रुपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यामुळे दोन्ही गटातील जमाव आमने-सामने आला आणि दगडफेक झाली. या राड्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. मात्र, जमाव मोठा असल्याने अधिकचा पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला. यावेळी पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या ३ नळकांड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर जमाव कमी झाला.

पोलिसांकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले असून, आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दोन गटांतील वादानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. धाराशिव शहरात झालेल्या राड्यानंतर धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी ३०७ व इतर कलमांतर्गत जवळपास १२५ पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, दगडफेकीच्या घटनेत अनेक वाहनांचे, दुकानांचे नुकसान झाले आहे. तसेच, ४-५ लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून इतर आरोपींचा देखील शोध घेतला जात असून, त्यांना देखील अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


