कौतुकास्पद! पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी लोकसत्ता तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानित…
कौतुकास्पद! पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी लोकसत्ता तरुण तेजांकीत पुरस्काराने सन्मानित…
धाराशिव (प्रतिक भोसले) – सर्जनशीलता, गुणवत्ता, बुद्धिमत्ता आणि सातत्याने नावीन्याचा ध्यास घेत भरीव कार्य करणाऱ्या तरुणांची जिद्द हा अनोखा मिलाफ अनुभवण्याची संधी दरवर्षी ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांच्या निमित्ताने मिळते. विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणाऱ्या १८ लखलखत्या तरुण तेजांकितांचा सन्मान सोहळा, (दि.२९ मार्च) रोजी केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रसिद्धीपासून दूर राहून विविध क्षेत्रांत कार्यमग्न असलेल्या आणि आपल्या कार्यातून समाजासाठी आदर्श ठरणाऱ्या तरुणांना योग्य वयात पुरस्काररूपी कौतुकाची थाप देणाऱ्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारांचे हे सहावे वर्ष आहे. आत्तापर्यंत देशभरातील ८० हून अधिक तरुण तेजांकितांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात आला आहे. यंदाही विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, क्रीडा, साहित्य, कला, मनोरंजन, कायदा, धोरणे, राजकारण, प्रशासन, उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रांतील १८ तरुण गुणवंतांचा सन्मान ‘लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार’ सोहळय़ात केला आहे. बोलताना पियूष गोयल म्हणाले की, मी अनेक पुरस्कार वितरण सोहळ्यांना उपस्थित राहिलो, पण असा कार्यक्रम कधी पाहिला नाही. हे पुरस्कारविजेते कोणतेही आडनाव किंवा घराण्यामुळे पुढे आलेले नाहीत, तर आपल्या कर्तबगारीने ते विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. हे तरुणच देशाचे भविष्य असून त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे.
देश-परदेशांतून आलेल्या शेकडो तरुण प्रज्ञावंतांच्या अर्जामधून या पुरस्कारांसाठी पात्र अशा १८ जणांची निवड करण्याचे काम मान्यवरांच्या परीक्षक समितीने केले. आयआयटी, मुंबईचे प्राध्यापक डॉ.मिलिंद अत्रे यांच्यासह ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन शर्मा, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक डॉ. मुक्ता पुणतांबेकर, प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या मान्यवरांच्या परीक्षक समितीने निवडलेल्या तेजांकितांना पुरस्काराने गौरवण्यात आले.
या मध्ये परीक्षक समितीने धाराशिवचे कर्तव्य दक्ष पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची निवड करून त्यांचा सुद्धा सन्मान केला आहे. पारधी समाजासाठी गुन्हेगारांच्या पुनर्वसनासह त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अतुल कुलकर्णी यांनी पहाट हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात समुपदेशन कौशल्य प्रशिक्षणसह मदत गट, गुन्हेगारांना दत्तक घेणे, पर्यायी उपजीविकेची व्यवस्था करणे, शिक्षण अशा विविध स्तरांवर काम केलं जातं होतं. याच बरोबर शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतकरी प्रेरणा अभियानही राबविले जात होते. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली होती, विशेष म्हणजे या सर्व अभिनव उपक्रमांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळू लागला, त्याचे परिणामही दिसू लागले. शेतकरी प्रेरणा अभियानातून ३६५ विवाद निकाली काढण्यात आले. पारधी समाजातील अनेक मुली पोलिस प्रशिक्षणासाठी तयार होऊ लागल्या. शेतकरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रयोग करू लागले. विशेष म्हणजे अतुल कुलकर्णी यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच समाजाला दिशा देण्याचं काम जे केलं आहे ते कौतुकास्पद आहे. याचीच दखल घेऊन लोकसत्ताने तरुण तेजांकित २०२३ पुरस्कार देऊन केलेल्या कामाची पोचपावती त्यांना या सन्मानातून दिली आहे.
लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार – २०२३
१) अतुल कुलकर्णी : कायदा व धोरण
२) राहुल कर्डिले : कायदा व धोरण
३) नेहा पंचमिया : सामाजिक
४) विवेक तमाईचिकर : सामाजिक
५) राजू केंद्रे : सामाजिक
६) सूरज एंगडे : सामाजिक साहित्य
७) सायली मराठे : उद्योजिका
८) अनंत इखार : उद्योजक
९) निषाद बागवडे : नवउद्यमी
१०) रुतिका वाळंबे : नवउद्यमी
११) अभिषेक ठावरे : क्रीडा
१२) ओजस देवतळे : क्रीडा
१३) दिव्या देशमुख : क्रीडा
१४) ज्ञानेश्वर जाधवर : कला
१५) प्रियांका बर्वे : मनोरंजन
१६) वरुण नार्वेकर : मनोरंजन
१७) हेमंत ढोमे : मनोरंजन
१८) प्रिया बापट : मनोरंजन