
शनिवारवाड्यात बेवारस बॅग; बॉम्बची अफवा…
शनिवारवाड्यात बेवारस बॅग; बॉम्बची अफवा…
पुणे (प्रतिनिधी) – शनिवारवाड्यात एक बेवारस पिशवी (बॅग) आहे. अशी चर्चा वाऱ्यासारखी पसरली, या घटनेमुळे पोलिस प्रशासनाची पळता भुई थोडी झाली. माञ योग्य ती खबरदारी म्हणून अजून पण शनिवारवाडा परिसराची बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. शनिवार वाड्यात सकाळी बेवारस पिशवी (बॅग) सापडली. या मुळे बॉम्बची अफवा पसरल्याने परिसरात घबराट उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊच्या सुमारास शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅग असल्याचा फोन पोलिसांना करण्यात आला होता. त्यानंतर बेवारस बॅग सापडल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक पथकाला बोलावले होते. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने तपास सुरु केला होता.


याबाबत पोलीस अधिकारी साईनाथ ठोंबरे म्हणाले की, शनिवार वाड्याच्या परिसरात बेवारस बॅग आढळल्याचा फोन पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. घटनास्थळी दाखल होऊन शनिवारवाडा परिसरात असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. तसंच बीडीडीएस टीम देखील बोलावली असून त्यांच्या माध्यमातून चौकशी केली जात आहे. परंतु कोणतीही बेवारस बॅग शनिवार वाडा परिसरातून आढळून आलेली नाही. ज्या व्यक्तीनं फोन केला त्याचा तपास सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



