
अहेरी महागाव येथील एकाच कुंटुंबातील ५ लोकांच्या रहस्यमय म्रुत्यु प्रकरणी मोठी अपडेट…
गडचिरोली – जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील महागावमध्ये काही
दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या एकापाठोपाठ होणाऱ्या गूढ मृत्यूनं अख्ख महागाव हादरलं होतं. मात्र त्यानंतर कुटुंबातील सुनेनं आणि मामीने पती, सासू, सासरा, नणंद आणि मावस सासूला विष देऊन त्यांची हत्या केल्याचं समोर आलं. या घटनेनं खळबळ उडली. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कुटुंबातील पाचही जणांची हत्या थलीयम हा विषारी धातू देऊन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुगलवर माहिती घेऊन हैदराबादवरून हा विषारी धातू मागवला होता. ज्या विषारी धातूचा हत्येसाठी वापर
करण्यात आला तो पारासदृष्य असून रंग आणि गंध नसलेला आहे. हे विष शरीरात हळूहळू मिसळणारे आहे. हत्येसाठी या धातूचा सहज वापर होत असल्यानं अनेक देशात या धातूवर बंदी घालण्यात आली आहे.
संघमित्रा असं या प्रकरणातील आरोपी सुनेचं नाव आहे, तिने तो
धातू हैदराबादवरून मागवला, हा धातू कुटुंबाच्या पाण्यात आणि जेवणात मिसळला. या घटनेत पंधरा दिवसांच्या आत पाच जणांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव येथे शंकर पिरू कुंभारे हे आपल्या कुटुंबासह राहत होते.
अचानक शंकरसह त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्य आजारी पडले. 20 सप्टेंबर रोजी शंकर आणि त्यांची पत्नी विजया कुंभारे यांची प्रकृती अचानक बिघडली. दोघांनाही प्रथम अहेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर त्यांना चंद्रपूरला स्थलांतरीत करण्यात आलं. तिथेही दोघांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्यांना नागपूरमधील प्रसिद्ध रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं. मात्र, शंकर कुंभारे यांचा 26 सप्टेंबर रोजी आणि विजया कुंभारे यांचा 27 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. आई-वडिलांच्या मृत्यूनं शंकर यांच्या विवाहित मुलीला मोठा धक्का बसला. या दु:खातून सावरण्याआधीच गडहेरी येथे राहणारी मुलगी कोमल दहागावकर आणि मुलगा रोशन शंकर कुंभारे यांची प्रकृती खालावली. शंकर कुंभारे यांची मेहुणी आनंदा उर्फ वर्षा उराडे
यांचीही प्रकृती खालावली. तिघांनाही उपचारांसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं. 8 ऑक्टोबर रोजी कोमलचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 14 ऑक्टोबर रोजी शंकर कुंभारे यांची मेहुणी आनंदा उर्फ वर्षा उराडे यांचा मृत्यू झाला तर
रोशन कुंभारे याचा 15 ऑक्टोबरला मृत्यू झाला. या प्रकारानं खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर सून संघमित्रा आणि तिच्या मामे सासूनच हे हत्याकांड घडवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.




