पोर्ला जंगल परिसरातील निर्घृण हत्येचा पर्दाफाश; २४ तासात आरोपी जेरबंद
पोर्ला जंगल परिसरातील निर्घृण हत्येचा पर्दाफाश; २४ तासात आरोपी जेरबंद…
गडचिरोली (प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या मध्ये आरोपीने प्रेम संबंधात झालेल्या वादातून मुलीचा खून करून तिला अर्धनग्न अवस्थेत तसेच फेकून दिले होते. या घटनेचा तपास करताना मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीस दलासमोर होते.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, (दि.२१डिसेंबर) रोजी मौजा पोर्ला वडधा मार्गावरील जंगल परिसरात एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील प्रेत आढळून आल्याने पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर घटनास्थळ हे पोर्ला गावापासून दिड किलोमीटर अंतरावरील असल्याने व घटनास्थळावरील परिस्थीतीमुळे संपुर्ण परिसरात खळबळ माजली होती. मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलिस दलासमोर होते. या प्रकरणाची तिव्रता लक्षात घेवून तात्काळ अपर पोलिस अधिक्षक, कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहाणी केली. श्वान पथक तसेच अंगुलीमुद्रा विभागातील अधिकारी यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. परंतु, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता चार तपास पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याची विशेष जबाबदारी सोपविली.
स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांनी त्यांचे सदर परिसरातील त्याचप्रमाणे संपूर्ण गडचिरोली व गडचिरोली लगत जिल्ह्यातील त्यांचे बातमीदारांना कार्यान्वीत करून माहिती घेत असतांना गडचिरोली शहरातील एका गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की, एक मुलगी वय अंदाजे (१९ वर्ष), रा.चंद्रपूर ही २०डिसेंबर पासून चंद्रपूर येथून बेपत्ता आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पोलिस स्टेशन, रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथून माहिती घेतली असता सदर मुली संदर्भात मिसींग क्रमांक १७८/२०२३ अन्वये नोंद आहे. त्यावरून तात्काळ मुलीच्या नातेवाईकांना विश्वासात घेवून मृतदेहाचे फोटो दाखविले असता मृतक मुलगी ही त्यांचीच मुलगी असल्याची नातेवाईकांकडून खात्री पटली. संबंधीत मिसींग कोठे व कशी झाली तसेच ती शेवटी कोणासोबत होती याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने माहिती घेतली असता सदर मुलीचे निखिल मोहुर्ले, रा.वैरागड याचेशी प्रेमसबंध असून तिला भेटण्याकरीता निखील मोहुर्ले येथे गेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वैरागड येथून निखील मोहुर्ले यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल विचारपूस केली असता त्याने प्रकरणाबाबत माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी नामे निखील मोहुर्ले यास पुढील तपासकामी गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार वाघ, श्रिकांत बोईना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दिपक लोणारे, माणिक निसार, माणिक दृधबळे, सतिष कत्तीवार, मनोहर तोगरवार तसेच पोलिस स्टेशन गडचिरोली येथील पोलिस निरीक्षक अरुण फेगडे, मपोउपनि विशाखा म्हेत्रे, भाऊराव बोरकर व इतर अंमलदार यांनी केली आहे.