
अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा..
अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा..
पुणे – पुण्यातील एका 65 वर्षीय माजी सैनिकाला अश्लील व्हिडिओ कॉल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन पावणे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरुन व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर विवस्त्र अवस्थेतील तरुणी बोलत होती. ते पाहताच त्यांनी तात्काळ कॉल बंद केला. यानंतर काही वेळाने फिर्यादी यांना एका व्यक्तीने फोन करुन गुन्हे शाखेतून पोलीस अधिकारी पांडे बोलत असल्याचे सांगितले. तुमचे अश्लील व्हिडिओ आमच्याकडे असून ते युट्यूब मॅनेजरकडून डिलीट करुन घ्या त्यानुसार फिर्यादी यांनी यूट्यूब मॅनेजरला फोन केला. त्यावेळी त्याने 11 हजार 600 रुपये जमा करावे लागतील. त्यापैकी 11 हजार रुपये तुम्हाला परत मिळतील असे सांगण्यात आले. फिर्यादी यांनी पैसे पाठवल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली.

सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्याकडे पाच वेळा पैशांची मागणी करुन तीन लाख 74 हजार रुपये उकळले. पैसे दिल्यानंतर पुन्हा फोन आला असता त्यांनी फोन उचलला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्य़ाद दिली.



