फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल
फ्रि फायर गेमवरची ओळख पडली महागात; तिचे न्यूड फोटो केले व्हायरल
पुणे – फ्रि फायर गेम मार्फत ऑनलाईन मैत्री ऑनलाईन फ्रेंडशिप करुन तिला न्यूड फोटो पाठवण्यास भाग पाडले. हे फोटो व्हायरल करुन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जून 2023 व जुलै 2023 मध्ये बिबवेवाडी येथे पीडित मुलीच्या घरी घडला होता. याप्रकरणी एकावर विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यावरुन अमनकुमार (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 354, 354ड, आयटी ॲक्ट 66 ई, पोक्सो कलम 11, 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी मागील तीन वर्षापासून फ्रि फायर गेम खेळते. या गेमच्या माध्यामातून आरोपीने मुलीसोबत ऑनलाईन मैत्री केली. आरोपीने जून 2023 व जुलै 2023 मध्ये दुसऱ्या मुलीला जिवे ठार मारतील अशी धमकी देऊन फिर्यादी यांच्या मुलीला तिचे न्युड फोटो पाठवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने रिलेशनमध्ये राहिली नाही तर ते फोटो तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची वेळोवेळी धमकी दिली. तसेच तिला सतत फोन करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.