
धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला गोळ्यांमधून गिळायला दिले ब्लेडचे तुकडे
धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीला गोळ्यांमधून गिळायला दिले ब्लेडचे तुकडे
पुणे – पुण्यातील उत्तमनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला कॅल्शियमच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती सोमनाथ सपकाळ (४५ वर्षे) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या नंतर ४१ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार ऑक्टोबर पासून सुरू होता. गेल्या २ महिन्यांपासून या दाम्पत्यामध्ये अनेक वाद विवाद सुरू होते. सोमनाथला त्याच्या पत्नीवर संशय होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते. सोमनाथने अनेकदा पत्नीला शिवीगाळ करून मारहाण सुद्धा केली होती.


या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती सोमनाथ हा पत्नी छायाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून पती नेहमी पत्नीला मारहाण करून तिचा छळ करत असे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शीअमच्या कॅप्सुल दिल्या. यात आधी ब्लेडचे तुकडे टाकले आणि ते तिला खायला दिले. तसेच ते जबरदस्तीने गिळायला लावले, असा आरोप महिलेने केला होता. फिर्यादीच्या गळ्यात जखमा झाल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि हा सगळा प्रकार समोर आला. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.




