
आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव…
आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव…
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तरुणांच्या एका गटाचा आक्षेपार्ह धार्मिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उस्मानपुरा भागात सोमवारी (दि.१) रोजी मध्यरात्री अचानक जमाव एकत्र आला. ही माहिती काही क्षणात शहरात पसरल्यामुळे शहरातील अन्य भागातही तणाव निर्माण झाला होता. सर्व पोलिस उपायुक्तांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि जमावाला शांत केले. कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव माघारी परतला. दरम्यान शहरात सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.


मागील काही दिवसांपासून शहरातील वातावरण किरकोळ
घटनांवरून दूषित केले जात आहे. चार दिवसांपूर्वीच कटकट गेट परिसरात भिन्न धर्मीय तरुण-तरुणी एका हॉटेलमध्ये जेवणाचे पार्सल आणायला गेल्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण शांत होते न होते तोच तरुणांच्या एका गटाने बनविलेला आक्षेपार्ह व्हिडिओ सोमवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा प्रकार एका गटाच्या लक्षात आला. त्यामुळे संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर चालून गेला. काही क्षणात ही माहिती नियंत्रण कक्षाला कळाली. पोलिस उपायुक्त नवनीत कावत, नितीन बगाटे, अपर्णा गीते, शीलवंत नांदेडकर, यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त रणजीत पाटील, पोलिस निरीक्षक सुशील जुमडे आणि रात्रगस्तीवरील चार ते पाच पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी तत्काळ उस्मानपुरा भागात दाखल झाले. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून जमावला कारवाईचे आश्वासन देत शांत केले. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणारा आणि व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे, या मध्ये जास्त अल्पवयीन तरुण असून हे शहरातीलच असण्याची शक्यता आहे.



