
सिगरेट पेटवायला माचीस दिली नाही म्हणून डोक्यात दगड घालून केली हत्या
सिगरेट पेटवायला माचीस दिली नाही म्हणून डोक्यात दगड घालून केली हत्या
नवी मुंबई – नवी मुंबईच्या तुर्भे नाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिगरेट पेटवायला माचीस दिली नाही म्हणून सुरक्षा रक्षकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. क्षुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाची हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.


प्रसाद भानुशाली असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा नेपाळचा असून तुर्भे नाका येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. दरम्यान, रविवारी आरोपी मोहम्मद अलीने भानुशालीकडे सिगरेट ओढायला माचिस मागितली. परंतु, भानुशालीने त्याला नकार दिला. म्हणुन फक्त एवढ्याच कारणावरुन मोहम्मद अलीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने रागाच्या भरात भानुशालीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. यानंतर मोहम्मद अली घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेची माहिती मिळताच तुर्भे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी फरार झालेल्या मोहम्मद अलीचा शोध घेऊन त्याला अटक केली. मोहम्मह अली हा पोलीस कस्टडीमध्ये असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. इतक्या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.



