अन्यथा ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा – डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अन्यथा ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा – डीवायएसपी डॉ.निलेश देशमुख

धाराशिव (प्रतिक भोसले) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा निकाल उद्या जाहीर होणार आहे. तेव्हा निकाल जाहीर झाल्यानंतर कोणीही सोशल मीडियाद्वारे (फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप) किंवा इतर माध्यमातून कोणत्याही समाजाच्या, जाती-धर्माच्या भावना दुखावतील, अशा पोस्ट, कमेंट, स्टोरी, स्टेटस, फोटो प्रसारित केले आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास संबंधित ग्रूपच्या ॲडमिनवर देखील कारवाई होऊ शकते. भारतीय दंड विधान संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत संबंधितांवर कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा धाराशिव पोलिसांनी दिला आहे.





लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजणार नाहीत, फटाके फोडले जाणार नाहीत, विनापरवाना विजयी मिरवणूक निघणार नाही, याची सर्वांनीच खबरदारी घ्यायची आहे. तसेच व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनने निकाल जाहीर होईपर्यंत ग्रुपचे सेटिंग ओन्ली ॲडमीन करून घ्यावे, जेणेकरून आपल्यावर कारवाई होणार नाही, असे आवाहन पोलिसांनी व्हॉट्स ॲप ॲडमिनला केले आहे. ग्रूपमधील कोणताही सदस्य त्या ठिकाणी वादग्रस्त पोस्ट टाकू शकणार नाही. मात्र, ऍडमिनने ग्रुपमध्ये सेटिंग बदल नाही केला आणि कोणी त्या ग्रूपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून त्यांच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



सोशल मिडियावरील एखाद्या पोस्टमधून कोणाचे चारित्र हनन झाल्यास, कोणाचा अवमान झाल्यास किंवा त्या पोस्टमधून जातीय तेढ निर्माण होऊन काही अनुचित प्रकार घडल्यास तथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, कोणाचा खून किंवा जबर हाणामारी झाली तर निश्चितपणे ग्रूपमधील त्या सदस्यासह ग्रूप ॲडमिनलाही जबाबदार धरले जाते. त्यांच्यावर आयपीसी कलम ३४ प्रमाणे (सामुहिक इरादा), कलम १५३ (राजकीय व सामाजिक तेढ) या कलमाप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाते. सोशल मिडियातून कोणी कोणाला शिवीगाळ केली किंवा धमकी दिल्यास कलम ५०४ व ५०६ प्रमाणे देखील कारवाई होते. या कलमाअंतर्गत संबंधितास ६ महिने ते ३ वर्षांपर्यंत शिक्षा होवू शकते, असे धाराशिव सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



सोशल मीडियासाठीही आचारसंहिता लागू असल्याने सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्या ग्रूपमधील सदस्यासह ग्रूप ॲडमिनलाही जबाबदार धरले जाते. त्यामुळे आपल्या ग्रुपवरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित होणार नाहीत, याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी. शक्यतो ‘ओन्ली ॲडमिन’ सेटिंग करावी. अशा वेळी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी. आचारसंहितेचा भंग व आक्षेपार्ह संदेश व्हायरल होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. अन्यथा संबंधितांविरोधात सायबर कलमान्वये कारवाई केली जाईल. असे डीवायएसपी डॉ. निलेश देशमुख यांनी आमचे प्रतिनिधी प्रतिक भोसले यांच्याशी बोलताना सांगितले आहे.

डीवायएसपी – डॉ.निलेश देशमुख, तुळजापूर 





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!