
परभणीच्या चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रुर हत्या…
नांदेड : शहरामधे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय
मुलाचे अपहरण करून त्याचा नांदेडमध्ये खून करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्याचे हात पाय बांधलेले होते. तसेच गळ्याला दोरी देखील बांधलेली होती. परमेश्वर प्रकाश बोबडे असे मृत मुलाचे नाव आहे. मृत परमेश्वर बोबडे हा बालक परभणी शहरातील कृषीसारथी येथील रहिवासी असून तो गुरुकुल निवासी शाळेत इयत्ता 9 वीमध्ये शिक्षण घेत होता. 7 सप्टेंबर रोजी पेपर देऊन तो गुरुकुलकडे जात होता. यावेळी
दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपींनी त्याचे अपहरण केले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलिस स्टेशन ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा मान्य केला. त्यांनी आपल्या जबाबात सांगितले कि, मुलाचा मृतदेह लोहा तालुक्यातील माळाकोळी जवळील माळेगावच्या तलावात हात पाय बांधून फेकण्यात आला. यानंतर परभणीच्या नवीन मोंढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस
निरीक्षक आर.टी. नांदगावकर, पोलिस अंमलदार नागनाथ मुंडे आणि पंकज उगले हे नांदेडला आले. त्यानंतर त्यांनी माळाकोळी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार आणि इतर कर्मचाऱ्यासोबत घटनास्थळी पोहचले. मुलाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. आरोपींनी 50 लाख रुपयाची खंडणी मागितली, अशी प्राथमिक माहिती आहे. खंडणी न दिल्यानेच त्या निरागस बालकाचा एवढ्या क्रूरतेने हत्या केल्याचे समोर आले आहे. परभणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या
घटनेने नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.


