
चार पिस्टल दहा राऊंडसह चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
चार पिस्टल दहा राऊंडसह चौघांना अटक; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
पिंपरी चिंचवड – गेल्या काही दिवसांमध्ये सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची संख्या हि दिवसेंदिवस वाढतच होती ज्या मध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. म्हणुन पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध शस्त्रे बाळगणारे गुन्हेगारांची माहीती मिळवुन कायदेशीर कारवाई करणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते. म्हणुन गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम त्यांचे अधिपत्याखालील पोलिस अधिकारी व अंमलदार पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांची माहीती घेत असतांना दि.३०नोव्हेंबर रोजी सहा. फौजदार शिवानंद स्वामी यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली कि, दोन इसम पिस्टलसह पी डब्लु डी ग्राउंड सांगवी या ठिकाणी आले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.


त्यानंतर गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांना याबाबतची माहीती कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करुन सदर पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन तात्काळ सांगवी भागात माहीतीची खातरजमा करणेसाठी पाठविले. पी डब्लु डी ग्राउंड सांगवी परिसरात सापळा लावुन माहीती घेतली असता बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाचे दोन इसम ग्राउंडलगत बोलत थांबले असल्याचे पोलिस पथकाच्या निदर्शनास आले. त्याचवेळी सदर संशयित इसमांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने ते पळुन जात असतांना पोलिस पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करुन पकडले. त्यांची नावे १) हरीष काका भिंगारे (वय ३४ वर्षे), धंदा- चालक, रा.औंध रोड आंबेडकरनगर चंद्रमणी संघ पुणे २) गणेश बाळासाहेब कोतवाल (वय ३० वर्षे), धंदा- चालक रा. समर्थनगर नवी सांगवी अशी आहेत. या दोन्ही इसमांचे अंगझडतीमध्ये कमरेला लावलेली दोन पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त करुन त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी सांगितले कि, गेले सहा – सात महीन्यापुर्वी मध्यप्रदेश येथे जावुन एकूण चार पिस्टल खरेदी करुन आणल्याचे व दोन पिस्टल पाषाण पुणे येथील त्यांचे मित्राला व एक पिस्टल पौड ता. मुळशी जि. पुणे येथील नातेवाईकाला दिल्याचे सांगितले. पाषाण पुणे येथुन ३) शुभम जगन्नाथ पोखरकर (वय ३० वर्षे), रा. स्टेट बँकनगर पंचवटी पाषाण पुणे व पौड ता.मुळशी येथुन ४) अरविंद अशोक कांबळे (वय ४२ वर्षे), धंदा शेती रा. मु.पो.पौड ता. मुळशी जि.पुणे येथुन सदर इसमांना दोन पिस्टल व ५ राउंडसह शिताफीने ताब्यात घेतले. असे एकूण ४ पिस्टल व १० राउंड जप्त केले आहेत.

मध्यप्रदेश येथुन पिस्टल खरेदी करुन आणण्याचा व जवळ बाळगण्याच्या उद्देशाबाबत तपास केला असता असे निष्पन्न झाले कि, आरोपी हरीष काका भिंगारे हा मुळचा उरावडे आंबेगाव ता.मुळशी येथील रहीवाशी असुन त्याचा तेथील स्थानिक इसमाशी शेत जमीनीच्या हक्कावरुन वाद आहे व त्याबाबत त्यांच्यात भांडणतंटे झाले होते. हरीष भिंगारे व गणेश कोतवाल हे दोघे मित्र असुन त्यांनी मध्यप्रदेशच्या सिमाभागात जावुन ४ पिस्टल व राउंड खरेदी करुन आणले होते. दोन पिस्टल त्यांनी स्वत:जवळ ठेवून दोन पिस्टल त्यांच्या ओळखीच्या शुभम पोखरकर व अरविंद कांबळे यांचेकडे दिले होते. तेव्हा आरोपींविरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे सांगवी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट २ कडून आरोपीत यांना अटक करण्यात आली असुन ४ पिस्टल व १० राउंड जप्त करण्यात आले आहेत. अटक आरोपी यांचेकडे पिस्टल जवळ बाळगण्याच्या हेतू विषयी गुन्हे शाखा युनिट २ अधिक तपास करीत आहे.

सदरची कारवाई हि पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे खप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप निरीक्षक गणेश माने, पोलिस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, दिलीप चौधरी, उषा दळे, नामदेव कापसे, आतिष कुडके, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.


