प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ प्रियकर बुरखा घालून शिरला शाळेत; नागरिकांनी केली धुलाई…
पुणे(प्रतिनिधी ) – प्रेयसीच्या भेटीसाठी व्याकूळ झालेल्या एका प्रियकराने शक्कल लढवली. चक्क बुरखा घालून तो थेट तिच्या शाळेत शिरला. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हा त्याचा समज होता. मात्र, हा समज सपशेल खोटा ठरला
. बुरखाधारी व्यक्ती मुले पळवणाऱ्या टोळीचा भाग असल्याचे समजून आजूबाजूच्या लोकांनी त्याची चांगली धुलाई केली. एवढ्यावरच न थांबता, त्याला थेट विश्रांतवाडी पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी तरुणाला पकडले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रेमात काहीच माफ नसते, याची प्रचिती या प्रेमवीराला आली.
एका २३ वर्षीय प्रियकराचे अल्पवयीन प्रेयसीवर प्रेम होते. तिच्या भेटीसाठी तो उतावीळ झाला होता. यासाठीच त्याने बुरखा पांघरूण शाळेत धडक मारण्याचे धाडस केले. पण त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. तो शाळेत शिरताच लोकांनी त्याला पकडले आणि मुले चोरणाऱ्या टोळीचा एक मेंबर असल्याचे समजून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पकडून थेट पोलिसांच्याच ताब्यात देण्यात आले. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी विजय अमृत वाघारी या तरूणाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुण एका केटरिंग व्यावसायिकाकडे कामाला आहे. त्याची शाळकरी मुलीशी मैत्री होती. ही माहिती मुलीच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्याला चोप देण्यात आला होता. कुटुंबीयांनी मुलीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. प्रेयसीला भेटता येत नसल्याने विजय व्याकूळ झाला. मुलीला भेटण्यासाठी त्याने शक्कल लढविली. त्याची आई जुने कपडे गोळा करण्याचा व्यवसाय करते. त्याला घरात एक बुरखा सापडला. बुरधा परिधान करुन तो मैत्रिणीला भेटण्यासाठी शाळेच्या परिसरात गेला. मात्र, त्याचा हा प्लान त्याच्याच अंगलट आला.
दरम्यान, शाळेच्या आवारात बुरखा घालून एकजण मुलींचे अपहरण करण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शाळेच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. तपास करुन तरुणाला पोलिसांनी पकडले. चौकशीत मैत्रिणीला भेटण्यासाठी बुरखा परिधान केल्याचे विजयने पोलिसांना सांगितले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लहू सातपुते, दीपक चव्हाण, शेखर खराडे, प्रफुल्ल मोरे आदींनी ही कारवाई केली.