
शिकारीसाठी बनवली बंदुक नंतर केली विक्री आणि मग…
शिकारीसाठी हत्यारे बनविणाऱ्या तरुणाला केली रोहा येथुन केली अटक….
अलिबाग (प्रतिनिधी) – आसपासच्या जंगलात जाऊन वन्यजिवांची शिकार करण्याचा छंद त्याला लहान वयात लागला. या प्राण्यांच्या शिकारीसाठी शस्त्रांची गरज होती. म्हणून पठ्ठ्याने चक्क बंदूका बनवण्यास सुरुवात केली. अनेकांना घरीच बंदूका तयार करून त्याने विकल्या, पण पोलिसांना सुगावा लागला. तपासाचे चक्र फिरले आणि बंदूका, शस्त्र बनवणारा आरोपी जेरबंद झाला. तन्मय भोपटे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपीकडून मोठा शस्त्रसाठा आणि २२ वन्यजीवांचे अवशेष पोलिसांनी हस्तगत केले आहेत.


रोहा येथील धनगर आळीत एका व्यक्तीकडे अग्नीशस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे यांच्या पथकाला या ठिकाणी तपास करण्याचे निर्देश दिले. पोलिस पथकाने या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा तन्मय सतीश भोपटे या २४ वर्षीय मुलाच्या घरात मोठा शस्त्रसाठा, बंदूक, काडतूसे बनविण्याचे साहित्य आणि वन्यजीवांचे अवशेष आढळून आले.

या ठिकाणाहून ४ बारा बोरच्या बंदूका, १ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर, ५ धारधार चाकू, २ तलवारी, ६ कोयते, ९० जिवंत काडतुसे, ५ रिकामे काडतूस, बंदूक आणि काडतूसे बनविण्याचे साहित्य, हरीण, सांबर, काळवीट यासारख्या वन्यजीवांची २२ शिंगे जोडी पोलिसांनी ताब्यात घेतली. या प्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३,४,५, (क)(ख) ७(क)(ख), २५ तर, वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम २(३२) ४८,५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तन्मय भोगटे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

तन्मयला लहानपणापासून वन्यजीवांची शिकार करण्याचा छंद लागला होता. रायगड जिल्ह्यातील विविध भागातील जंगल भागात जाऊन तो शिकार करत होता. २२ वन्यजीवांची त्याने शिकार केली आहे. यात हरीण, काळवीट, सांबर यासारख्या वन्यजीवांचा समावेश आहे. शिकारीसाठी बंदुकीची गरज असल्याने सुरुवातीला त्याने देशी बनावटीची एक बंदुक खरेदी केली. नंतर मात्र त्याने स्वतःच बंदुका बनवायला सुरुवात केली. निरनिराळ्या प्रकारच्या बंदूका तो बनवू लागला. गरज ही शोधाची जननी असते म्हणतात. याच उक्तीप्रमाणे हळुहळु काडतूसे बनवण्याचे कसबही त्याने आत्मसात केले. तो याचा वापर शिकारीसाठी करू लागला. रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राहत्या घरात त्याने चक्क बंदूका बनविण्याचा उद्योग सुरू केला. या बंदुका काही जणांना विकल्या. अत्यंत गोपनीय पद्धतीने त्याने हा व्यवसाय सुरू केला. पण पोलिसांना या गोष्टीचा सुगावा लागला.
यानंतर तपासाचे चक्र फिरले आणि तन्मयच्या बंदूक बनवण्याच्या उद्योगाचा पर्दाफाश झाला. त्याने शिकारीतून जमा केलेल्या वन्यजीवांच्या अवशेषांचे घबाड पोलिसांना सापडले. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलिस हवालदार जितेंद्र चव्हाण, रुपेश निगडे, विशाल आवळे, पोलिस शिपाई अक्षय सावंत, मोरेश्वर ओमले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


