
गुंजोटी येथील खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप; चौघे पुण्याचे
गुंजोटी येथील खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप; चौघे पुण्याचे
धाराशिव – उमरगा तालुक्यातील औराद (गुंजोटी) येथे शेतीच्या वाटणीवरुन पुतण्याने चुलत्याचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.३०) रोजी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० मे २०२० रोजी झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.


औराद येथील दिगंबर गणपती दुधभाते यांचा मुलगा शिवकांत व पवन दिलीप दुधभाते हे २० मे २०२० रोजी सकाळी अकराच्या दरम्यान गाव शिवारात शेळ्या चारत फिरत होते. त्यावेळी पवनला त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तींचा फोन आला. तो व्यक्ती दिगंबर दुधभाते कोठे आहे, याची चौकशी करत होता. सांयकाळी सहाच्या सुमारास दिंगबर, त्याचा मुलगा शिवकांत व अन्य लोक मधुकर पवार याच्या शेताजवळ होते, त्यावेळी समोरच्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून (क्र. एम एच १२ जी झेड २८२१) दिंगबरचा पुतण्या अक्षय शेषेराव दुधभाते रा. औराद, मुकेश कांबळे, रा.औराद हे आले. यावेळी अक्षय हा चुलता दिगंबर यास म्हणाला की, तू माझ्या बापाला का बरं मारलास, तुला घरात व शेतात कसलीच वाटणी मिळू देणार नाही, असे म्हणत अक्षय व मुकेश यांच्यासह अनोळखी इतर चार व्यक्तींनी दिगंबर यास वेळूच्या काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर तेथून आरोपींनी पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या दिंगबरचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दिंगबरची पत्नी दैवता यांच्या तक्रारीवरुन दि.२१ मे रोजी गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलिस उपनिरिक्षक अमोल मालुसरे यांनी चौकशी करुन दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयात बचाव पक्षातर्फे तीन साक्षीदार तपासण्यात आले तर सरकार पक्षातर्फे एकूण २५ साक्षीदारातील डॉ. मल्लिकार्जन खिचडे, विजय दुधभाते, श्रीनिवास पवार, यशवंत पवार, प्रत्यक्षदर्शी शिवाजी गायकवाड, पवन दुधभाते, शिवकांत दुधभाते, विक्रांत कांबळे, फिर्यादी दैवता दुधभाते, अतूल जाधव, डॉ. धर्मराज दुड्डे, संतोष बोयने, शरद मारेकर, गुरुनाथ वाकोडे व अमोल मालूसरे यांची महत्वपूर्ण साक्ष दिली. साक्षीदारांनी दिलेला जबाब व सहाय्यक शासकिय अभियोक्ता ॲड. संदीप देशपांडे यांच्या युक्तिवादावरून सत्र न्यायाधीश डी.के.अनुभुले यांनी अक्षय दुधभाते, मुकेश कांबळे रा. औराद, वैभव शेलार, निनाद महाडिक, मंगेश चौधरी, सागर ढोकणे रा. सर्वजण कर्वेनगर पुणे यांना शिक्षा सुनावली आहे.



