आवाज कुणाचा…खाकीतील लेखकाचे मनोगत..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

‘ *आवा…ज कोणाचा?’*

‘आवा…ज कोणाचा ? ‘ ही घोषणा लहानपणापासून आपण सर्वजण ऐकत आलेलो आहोत.एखादी निवडणूक जिंकली, की मग ती निवडणूक एखाद्या सोसायटीची असो ग्रामपंचायतीची असो की लोकसभा, विधानसभेची . एखाद्या खेळाचा सामना जिंकला तरी ‘आवाज कोणाचा ?’ ही घोषणा ऐकायला मिळते.
प्रत्येक जण आपला आवाज मोठा करून आपले मोठेपण सिद्ध करण्याचा आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्याचा प्रयत्न करतो . मोठेपण सिद्ध करण्याच्या आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण आपला आवाज आणखी मोठा करत असतो . कोणी आपल्या गाडीच्या सायलेन्सर मधून आवाज काढून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात, कोण कर्णकर्कश हॉर्न वाजवत गाडी पळवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात . प्रगत देशांमध्ये अनावश्यक हॉर्न वाजविणे हे असभ्यपणाचे लक्षण मानले जाते . आपल्या येथे घरातून एखाद्याला बोलवायचे असले तरी दारात गाडी उभी करून जोरजोरात हॉर्न वाजविला जातो . परिसरातील सर्वांचे लक्ष आपोआप त्या हॉर्न वाजविणाऱ्याकडे जाते . ज्याला हॉर्न वाजवून बोलविण्यात आलेले असते त्याच्या व्यतिरिक्त आणखी 2 – 3 घरातील व्यक्ती बाहेर येऊन आपल्याला बोलविले की काय याची खात्री करतात.हॉर्न वाजवून आवाज काढणारा मात्र बिनधास्त असतो . त्याला काही नसते.
गणपती विसर्जन मिरवणूकी मध्ये एका पाठोपाठ एक लागून असलेल्या प्रत्येक मंडळाची एक स्वतंत्र डीजे म्युझिक सिस्टीम असते. त्या उभारलेल्या स्पीकरच्या भिंती पुढे लोक बेधुंदपणे नाचत असतात.डीजे म्युझिक सिस्टीम च्या समोर थोडा वेळ जरी उभा राहिले तर कानाचे पडदे फाटतील की काय असे वाटते. छातीमध्ये धडधड होते.पोट आणि हृदय त्या म्युझिक सिस्टिम सोबत कंपन पावायला लागते. सन 2014 साली सातारा शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीतील अशाच म्युझिक सिस्टिमच्या आवाजामुळे अगोदरच मोडकळीस आलेली इमारत पडली आणि जीवीत हानी झाली अशाच प्रकारे डीजे सिस्टीम वापरून नवरात्रीतील विसर्जनाच्या मिरवणुका निघतात.या व्यतिरिक्त दहा दिवस मोठ्या आवाजात आपल्या मंडळासमोर गाणी लावून आपल्याच मंडळाचा आवाज मोठा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच प्रकारच्या मिरवणुका राम नवमीला ही काही शहरांमध्ये निघतात रामाच्या समोर बेधुंद होऊन म्युझिक सिस्टिमच्या मोठ्या आवाजावर लोक नाचतात महापुरुषांच्या जयंत्या ही अशाच स्पीकरच्या मोठ्या भिंती उभा करून साजऱ्या केल्या जातात.कोणी सर्वात जास्त स्पीकरची मोठी भिंत उभी केली? कोणाचा आवाज मोठा होता? त्यानुसार त्या महापुरुषाची जयंती सर्वात मोठ्या स्वरूपात साजरी झाली असे मानले जाते.  लग्नामध्ये नवरदेव मिरवताना तर पूर्णपणे वाहतुकीची कोंडी झालेली असते.इकडे मात्र डीजे सिस्टीमवर नवरदेवासमोर नाचणे चालू असते. येथे सुद्धा आवा…ज कोणाचा हीच भावना असते.
लोणंद येथे नवरदेव मिरवताना डीजे सिस्टीम समोर नाचत असताना एका युवकाचे हृदय बंद पडून मृत्यू झाला अशी बातमी वर्तमानपत्रात वाचण्यात आली होती. रात्रभर मोठा स्पीकर लावून जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला जातो. आजुबाजूचे शेजारी तर सोडाच गावातील सर्वांना जबरदस्तीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम ऐकावा लागतो.काही मंदिरांमध्ये तर मंदिराच्या कळसावर स्पीकर लावून दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची गाणी लावली जातात.पहाटे चार वाजता स्पीकरवरून आरती लावली जाते. ज्यांना ते ऐकण्यामध्ये रस नाही, त्यांनाही ते सर्व जबरदस्तीने ऐकावे लागते.अभ्यास करणारी मुले, वयस्कर मंडळी, गरोदर महिला, लहान बालके,आजारी व्यक्ती यांना त्याचा त्रास होतो पण त्या मंदिराच्या ट्रस्टीची हीच भावना असते की ‘ आवा..ज कोणाचा?’ म्हणजे आवाज आमचाच  शहरामध्ये एकाच वेळी अनेक जणांनी मस्जिद वरील किमान 4 स्पीकर मधून मोठ्या आवाजात अजान द्यायची. ती ही दिवसातून पाच वेळा त्यापैकी एक अजान पहाटे. त्यावेळी माणसे काय ? पण पशुपक्षी ही झोपलेले असतात. वातावरणात एक हवी हवी वाटणारी शांतता असते. स्पीकर वर मोठ्या आवाजात अजान देताना सुद्धा प्रार्थनेपेक्षा,अल्लाह ची आराधना करण्यापेक्षा ‘आवा…ज कोणाचा?’हे दाखविण्याचीच स्पर्धा असते. कारखान्यांमध्ये रात्रभर काम करून आलेले ,हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करून येणारे ,रात्रभर वाहन चालवून आलेले बसचे,ट्रकचे वाहनचालक, नाईट ड्युटी करून आलेले पोलीस सकाळी आपल्या घरी विश्रांती घेत असतात,त्यावेळी अशा प्रकारे पहाटे,सकाळी मोठ्या आवाजात आरती, अजान,देवाची गाणी यांच्या आवाजाचा त्रास या लोकांना सहन करावा लागतो.वयस्कर, वृद्ध लोकांची झोप कमी झालेली असते तर काहींना निद्रानाशाचा त्रास असतो पण देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली आवाज करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होतो आहे हे काही जणांना समजत नाही तर काही जणांना समजून ही ‘आवा…ज कोणाचा?’ तर आवाज माझा हे लोकांना दाखवून इतरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. खरं तर शालेय स्तरापासून आपण ध्वनी प्रदूषणाची कारणे, त्याचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय हे आपण शिकत आलो आहोत,तरीसुद्धा जाणीवपूर्वक आपण त्या दुष्परिणाम कडे दुर्लक्ष करत आहोत. शांत वातावरणात जीवन जगण्याच्या व्यक्तीच्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष करत आहोत. ‘आवा..ज कोणाचा?’ तर माझाच,हे दाखवायचे असते.
पूर्वी लाऊड स्पीकर नव्हते, म्युझिक सिस्टिम नव्हती, त्यावेळी ही अजान,आरती होत होती, उत्सव आणि जयंती साजरी होत होती.
प्रसार माध्यमे शास्त्रशुद्ध माहिती लोकांपर्यंत पोहोचवत नाही, तज्ज्ञांची मते लोकांपर्यंत पोहोचवत नाहीत,ध्वनिप्रदूषणाच्या दुष्परिणाम बाबत लोकजागृती करण्याऐवजी, शांत वातावरणात जीवन जगण्याच्या व्यक्तीच्या मूलभूत हक्काबाबत जाणीव जागृती करण्याऐवजी त्याच्या उलट कार्य करताना दिसत आहेत.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर थोड्या- थोड्या अंतरावर ज्याप्रमाणे स्पीकर बसून कमी आवाजामध्ये प्लॅटफॉर्मवरील सर्वांना ऐकायला जाईल याप्रमाणे रेल्वेगाडी बाबत घोषणा (अनाउन्समेंट) केली जाते, त्याप्रमाणे मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सभास्थळी उपाययोजना करून आवाजाची पातळी कमी ठेवता येईल.आपल्या मोबाईल मध्ये अजानाची वेळ रिमाइंडर म्हणून सेट करता येईल आणि धुन, रिंगटोन म्हणून अजान आणून ठेवता येईल. ज्यांना नमाज पठण करावयाचे आहे, भजन-कीर्तन करावयाचे आहे,ते स्वतःहून मज्जिद,मंदिर, गुरुद्वारा मध्ये जातील. लाऊडस्पीकर लावून त्यांच्या घरापर्यंत ,पोहचविण्याची आवश्यकता नाही. ध्वनीच्या विविध स्त्रोतांमुळे सार्वजनिक ठिकाणी वाढणाऱ्या सभोवतालच्या ध्वनीच्या/आवाजाच्या पातळीमुळे मानवी आरोग्यावर व लोकांच्या मानसशास्त्रीय तसेच शारीरिक स्वास्थ्यावर हानिकारक परिणाम होत असल्याने ध्वनी उत्पादन करणाऱ्या व निर्माण करणाऱ्या स्रोतांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण) नियम 2000 नुसार काही नियम तयार केलेले आहेत, जर या नियमांचे उल्लंघन झाले तर पर्यावरण (संरक्षण)अधिनियमातील कलम 15 नुसार नियमांचे अनुपालन करण्यात कसूरी करणाऱ्यास 5 वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची किंवा एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील अशी तरतूद आहे, परंतु कायदा राबविताना म्हणजेच विविध उत्सवातील,महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमातील डीजे म्युझिक सिस्टीम वर कारवाई करताना, मस्जिद आणि मंदिरावरील भोंग्यावर वर कारवाई करताना कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असे गृहीत धरून जसे चालू आहे तसेच चालू ठेवण्याला प्राधान्य दिले जाते.त्याचप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्यांना थांबविणे कितीही योग्य असले , कितीही हितकारक असले तरी ध्वनिप्रदूषण निर्माण करणाऱ्या वर्गाला/गटाला/समाजाला न दुखविण्याची भूमिका सुद्धा काहीजण घेतात.



*सदर लेखाचे लेखक श्री गणेश कानगुडे ह  धाराशिव पोलिस अधिक्षक कार्यालयात जिल्हा विशेष शाखेत पोलिस निरीक्षक म्हनुन कार्यरत आहेत*







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!