
माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा,पती पत्नी जखमी…
माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा; पती पत्नी जखमी
धाराशिव – भूम तालुक्यातील वालवड येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरी मध्यरात्री चोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. मास्क घातलेल्या चोरांनी यावेळी केलेल्या मारहाणीत शिंदे व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. कपाटातील साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख २० हजार रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले.


रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास चुंबळी रोडवरून घराच्या पाठीमागील सीताफळाच्या बागेमधून आत येत आठ चोरट्यांनी दरोडा टाकला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिंदे यांच्या पत्नी यांना दोन व्यक्ती पोर्च मध्ये असल्याचे दिसले. त्यांनी आपल्या पतीला सांगितल्यानंतर शिंदे यांनी आरडाओरड करताच चोरांनी दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. या चोरांनी मास्क घातलेला होता. चोरांनी शिंदे व त्यांच्या पत्नीला काठीने व रॉडने मारहाण केली. दमदाटी करून गळ्यातील गंठण जबरदस्तीने हिसकावले. कपाटामधील साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम काढून घेतली व चोर पसार झाले. शिंदे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वालवड गावातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू असून तालुक्यातील पोलिसांच्या एकूण तीन टीम तपासासाठी पाठविल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी हे पुढील तपास करत आहेत.



