धक्कादायक! आई तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट – दागिने गायब
धक्कादायक! आई तुळजाभवानी देवीचा सोन्याचा मुकुट – दागिने गायब
धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकूट गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस दिसून आले असून, तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. केवळ मुकूटच नाही, तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील भाविकांत खळबळ माजली आहे. मंदिर संस्थानाने उपविभागीय अधिकारी गणेश पवार (उमरगा) यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली. 27 अलंकारांपैकी 4 अलंकार गायब आहेत, तर 12 पदराच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्रही हरवले आहे. 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूटही गायब झाला आहे. ही चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकूट ठेवला. तसेच पुरातन पादुका काढून नव्या बसवण्यात आल्या.
तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दुर्मिळ दागिने एकूण सात डब्यांत ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचे वय ३०० वर्षांपासून ते ९०० वर्षांपर्यंत जुने आहे. डबा क्र. १ हा विशेषप्रसंगी वापरला जातो. शारदीय व शाकंभरी नवरात्रौत्सव, संक्रांत, रथसप्तमी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, शिवजयंती अशा महत्त्वाच्या दिवशी या डब्यातील दागदागिन्यांचा साज तुळजाभवानी देवीला केला जातो. या डब्यात एकूण २७ प्राचीन अलंकार आहेत. त्यांपैकी चार अलंकार गायब असल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. शिवाय अनेक अलंकाराच्या वजनात कमालीची तफावत नोंदविण्यात आली आहे.
दागिने तपासणी समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये अनेक अनागोंदी, तफावत असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणात दोषी कोण हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करते आहे. त्या समितीचा अहवालही एक-दोन दिवसात येईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घ्यायची का, यावर निर्णय घेतला जाईल.
जिल्हाधिकारी – डॉ. सचिन ओंबासे