
वसईत किरकोळ कारणावरून गायकाची हत्या; वाहनचालकास अटक
वसई : वसईतील एका लॉज मध्ये उतरलेल्या हैदराबाद येथील गायकाची रविवारी दुपारी हत्या करण्यात आली. राधाकृष्ण व्यंकटरमन (वय ५८) असे या हत्या झालेल्या गायकाचे नाव आहे. याप्रकरणी लॉज मध्ये उतरलेल्या राजू शहा नावाच्या वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली. गायक राधाकृष्ण व्यंकटरमन (वय ५८) हैदराबादला राहतात वसईतील एका लग्नामध्ये गाणे गाण्यासाठी ते आले होते.
वसई मधील यात्री लॉज मध्ये त्यांनी मुक्काम केला होता. याच लॉजमध्ये राजू शहा नावाचा वाहनचालक उतरला होता. हे दोघे एकाच रूममध्ये राहत होते. रविवारी दुपारी किरकोळ गोष्टींवरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी राजू ने जवळच असलेल्या चाकूने व्यंकटरामन यांची हत्या केली. लॉज मधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले आणि पोलिसांनी घटनास्थळावरूनच राजुला अटक केली. आरोपी राजू शहा हा गुजरातला राहणारा आहे.


विशेष म्हणजे गायक व्यंकटरामन यांनी काही दिवसांपूर्वी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या उद्घाटन प्रसंगी गाणी सादर केली होती. आता आम्ही आरोपी राजू शहा याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे अशी माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.



