
हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम
हरवलेले मोबाईल परभणी पोलिसांनी मूळ मालकांना दिले परत; राज्यात राबवली होती विशेष मोहिम…
परभणी – हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी पोलिसांनी केली आहे. या साठी राज्यात एक विशेष मोहिम राबवली होती. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी मोहिमे अंतर्गत तपास सुरू केला, तपासांती हरवलेले मोबाईल पोलिसांना सापडले. ते काल 15 डिसेंबर रोजी पोलीस मुख्यालयात आयोजीत कार्यक्रमात मूळ मालकांना परत देण्यात आले.


पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे व पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या अधिपत्याखाली पोलिस स्टेशन सायबर यांच्या तांत्रीक विश्लेषनाच्या आधारे परभणी पोलिसांची एकूण 14 पथके ज्यात 29 अंमलदार यांची नियुक्ती करुन सन 2023 या वर्षात गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी दि.01 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान 14 दिवस विशेष मोहीम राबवण्यात आली. याच प्रकारची मोहीम यापुर्वीही श्रीमती रागसुधा आर. पोलिस अधीक्षक परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे परभणी पोलिसांकडून राबवण्यात आलेली होती, ज्यात 25 लाखांचे 158 मोबाईल हस्तगत करण्यास यश आलेले होते. सदरची मोहीम ही महाराष्ट्र राज्यातील परभणी, नांदेड, लातुर, जालना, छ. संभाजी नगर, सातारा, बिड, हिंगोली नाशीक, पुणे, अकोला, वाशीम, अहमदनगर, बुलढाणा व धाराशिव जिल्ह्यातून तसेच शेजारील तेलंगना राज्यातून निजामबाद या भागात राबवण्यात आली. या मोहीमे अंतर्गत मिळून आलेले मोबाईल ज्यांची किंमत तब्बल 38,09,260/- रुपये किंमतीचे सर्व गहाळ मोबाईलचे तक्रारदार यांना संपर्क करुन त्यांना दि.15 डिसेंबर रोजी पोलिस मुख्यालय परभणी येथे बोलावून पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. आपले स्मार्टफोन परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिस दलाचे धन्यवाद म्हणत आभार व्यक्त केले.

या वेळी सदर कार्यक्रमास पोलिस अधीक्षक परभणी. श्रीमती रागसुधा आर., अपर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या सह पोलिस अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. विशेष म्हणजे सदर मोहिमेत कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अंमलदारांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले व मोहिमेतील अंमलदारांना पोलिस अधीक्षक परभणी यांनी 50,000/- रु. बक्षीस जाहिर केले.



