नाशिक ग्रामीण पोलिसांची बनावट दारु बनवणार्या कारखान्यावर धाड….
नाशिक (ग्रामीण) – जिल्ह्यातील अवैध दारू विक्री उत्पादनांची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी
मागील काही महिन्यांपासून व्यापक शोध मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने विशेष पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात बनावट दारू बनविणा-या कारखान्यावर धाड टाकून कारवाई केली आहे.
दिनांक २५/०९/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात काही इसम हे एका शेतातील
शेडमध्ये अवैधरित्या बनावट देशी व विदेशी दारू बनविण्याचा कारखाना चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे ग्रामीण पोलिसांचे विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक . दत्ता कांभिरे यांचे पथकाने डोंगरगाव शिवारात संशयीत कैलास आहिरे यांचे शेतातील घराचे पाठीमागे असलेल्या शेडमध्ये धाड टाकली. सदर ठिकाणी
१) कैलास मुरलीधर आहिरे,
२) प्रतिक कैलास आहिरे, दोघे रा. डोंगरगाव, ता. देवळा
हे स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदा बनावट देशी व विदेशी दारू तयार करत असल्याचे आढळून आले. बनावट दारू ही मानवी जिवीतास हानिकारक असल्याचे माहीत असतांना देखील, वरील दोन्ही इसम हे सदर ठिकाणी बनावट देशी व विदेशी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व साधने, तसेच दारू विक्री व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे चारचाकी वाहनासह मिळून आले आहे. सदर छापा कारवाईत बनावट देशी व विदेशी दारू भरण्यासाठी लागणा-या विविध कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या, झाकणे, रिकाम्या बाटल्यांमध्ये मद्य भरण्यासाठी लागणारे मशीन, बाटलीचे सिल, झाकण पॅक करण्यासाठी लागणारे मशीन, बॉटलींग कंपनीचे बॉक्स व लेबल्स, बाटल्यांवर बॅच नंबर्स
टाकण्यासाठी वापरण्यात येणारे रबरी शिक्के, देशी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, प्लॅस्टिकचे ड्रम, प्रिन्स संत्रा व इम्पेरियल ब्लू कंपनीच्या मद्य भरलेल्या २२३ बाटल्या तसेच वाहतूक व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणारे होण्डा बी. आर. व्ही. वाहन असा एकूण १०,०५,०४४/- रूपये किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील दोन्ही आरोपींविरूध्द देवळा पोलिस ठाणे येथे गुरनं. २६८/२०२३ भादवि कलम ३२८ सह महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी हे मागील काही महिन्यांपासून बनावट दारूचा कारखाना चालवित असून सदर ठिकाणी देशी प्रिन्स संत्रा, प्रिन्स भिंगरी, टॅगो पंच, इम्पेरियल ब्लू, मॅकडॉवेल्स नंबर १ या कंपन्यांची दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर आरोपीविरूध्द यापुर्वी देखील देवळा, सटाणा, सुरगाणा पोलिस ठाण्यांमध्ये दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक . शहाजी उमाप व अपर पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी कांगणे-केदार, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक . हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक . दत्ता कांभिरे, पोना संतोष थेटे, पोकॉ नारायण करवर, धनंजय देशमुख, मनोज सानप, मपोकॉ कल्पना लहांगे, चापोहवा गोपीनाथ बहिरम यांचे पथकाने सदर
छापा टाकून कारवाई केली आहे.