
सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली..
सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली..
सोलापूर – सोलापूर जिल्हा कारागृहात असलेल्या एका पोलीस अंमलदाराने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


सोलापूर जिल्हा कारागृहात शनिवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. जेलमधील शिपाई विकास गंगाराम कोळपे (वय ३४, नेमणूक, सोलापूर जिल्हा कारागृह, रा.कारागृह वसाहत, सोलापूर) या कारागृह कर्मचाऱ्याने स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी फेसबुकवर स्वतःचा फोटो आणि स्वतःलाच श्रद्धांजली अर्पण करून आत्महत्या करत असल्याची पोस्ट करून स्वत:वरच गोळ्या घालून घेतल्या. कारागृह कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःची जन्म तारीख आणि मृत्यू तारीख लिहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करून आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती पोस्ट केली.

विकास कोळपे यांनी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्वतःच्या छातीत गोळ्या घालून घेतल्या. गोळ्या घालून घेण्याअगोदर विकास कोळपे या पोलिस कर्मचाऱ्याने फेसबुकवर पोस्ट केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत आत्महत्या करत असल्याची माहिती पोस्ट केली. स्वतःची जन्म दिनांक आणि मृत्यू दिनांक लिहिली. स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

विकास कोळपे कारागृहातील या पोलिस शिपायाने शनिवारी सायंकाळी स्वतःच्याच छातीत गोळ्या झाडून घेतल्या. ही बाब कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच विकास कोळपे यास शासकीय रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल केले. डॉक्टरांनी ताबडतोब विकास कोळपे यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू केले. काही वेळानंतर नातेवाईकांनी विकास यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. विकास कोळपे हे सांगली, पुणे, अहमदनगर येथे तैनात होते. ते जुलै २०२१ पासून सोलापूर जिल्हा कारागृहात तैनात होते.


