
खून प्रकरणातील ६ आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक; स्थानिक गुन्हे शाखा व बार्शिटाकळी पोलिसांची संयुक्त कारवाई
बार्शिटाकळी (अकोला): बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे निंबी येथे शेतीच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुण अनिकेत भास्कर इंगळे (वय २७ वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन अकोला पोलीस अधीक्षक अनिकेत वांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शिटाकळी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून अवघ्या १२ तासांच्या आत ६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
घटना काय होती?
दिनांक ३०/०६/२०२६ रोजी फिर्यादी सौ. प्रार्थना भास्कर इंगळे यांनी तक्रार दिली की, आरोपींनी संगनमत करून त्यांचा मुलगा अनिकेत याच्या डोळ्यात मिरची पावडरचे पाणी टाकले आणि डोक्यात हातोड्याने मारून त्याला जिवानिशी ठार मारले. यावरून बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अशी झाली अटक:
-
पातूर परिसरातून २ आरोपींना अटक: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे विशाल सुरेश करवते (वय २८) आणि अमोल सुरेश करवते (वय ३०, दोन्ही रा. निंबी) यांना पातूर येथून पळून जाण्याच्या तयारीत असताना वेढा घालून ताब्यात घेतले.
-
बार्शिटाकळी पोलिसांकडून ४ आरोपींना अटक: बार्शिटाकळी पोलीस ठाण्याच्या पथकाने इतर ४ फरार आरोपींना ताब्यात घेतले. यात सुरेश हरिभाऊ करवते (वय ६०), रेखा सुरेश करवते (वय ५२), अस्मीता विनोद सुरवाडे (वय २५) आणि सौ. मयुरी अमोल करवते (वय २३, सर्व रा. निंबी) यांचा समावेश आहे.

या धडक कारवाईत पोलीस अधीक्षक अनिकेत वांडक, मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि नितीन लेव्हरकर, पो.नि प्रविण धुमाळ व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.






