
अकोला: नगरसेविका रफिया बि यांच्या पतीची चाकू भोसकून हत्या; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद
अकोला: नगरसेविका रफिया बि यांचे पती याकुब खान यांची चाकू भोसकून हत्या; मुख्य आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अकोला (दिनांक ३० जून २०२६): अकोला जिल्हा पोलीस दलाच्या रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. जुने शहर येथील नगरसेविका रफिया बि याकुब खान यांचे पती याकुब खान युनुस खान यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. रामदासपेठ पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत मुख्य आरोपीला तात्काळ अटक केली आहे.ही धडक कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर विभाग) सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आज दिनांक ३०/०६/२०२६ रोजी याकुब खान युनुस खान हे रेल्वे स्टेशनकडून अग्रसेन चौकाकडे आपल्या इलेक्ट्रिक ओला दुचाकीवरून जात होते. जिजाऊ हॉलसमोरील रस्त्यावर आले असता, अग्रसेन चौकाकडून विरुद्ध दिशेने वसीम अहमद उर्फ चांदवड्या गुलाम अयुब हा त्याच्या एका सहकाऱ्यासह मोटारसायकलवर आला. वसीमच्या सहकाऱ्याने अंगात लाल टी-शर्ट घातलेला होता.

वसीमने आपल्या दुचाकीने याकुब खान यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. धडक बसताच वसीमच्या मागे बसलेला त्याचा सहकारी तिथून पळून गेला. धडकेमुळे याकुब खान गाडीवरून खाली पडताच, वसीम अहमद याने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने आपल्या जवळील चाकूने त्यांच्या छातीवर, पोटावर आणि डाव्या मांडीवर सपासप वार केले.
पोलीस कर्मचाऱ्याचे धाडस आणि आरोपीला अटक
हल्ला करून वसीम अहमद घटनास्थळावरून पळून जात असताना, रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रविण ढगेकर यांनी कमालीची तत्परता दाखवली. त्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता पळून जाणाऱ्या मुख्य आरोपी वसीम अहमद याला शिताफीने जागीच पकडले आणि रामदासपेठ पोलीस ठाण्यात आणले.

उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर जखमी झालेल्या याकुब खान यांना इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ‘आयकॉन हॉस्पिटल’मध्ये हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान याकुब खान युनुस खान यांची प्राणज्योत मालवली.
हल्ल्याचे कारण आणि गुन्हा दाखल
पोलीस तपासात समोर आले आहे की, जखमी (मृत) आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे तसेच नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये आपसातील जुना वाद होता, ज्यातून हा हल्ला झाला.

या प्रकरणी फिर्यादी ईस्माईल खान याकुब खान यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून सुरुवातीला रामदासपेठ पोलीस ठाण्यात अप. क्र. ४३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०९(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, उपचारादरम्यान याकुब खान यांचा मृत्यू झाल्यामुळे या गुन्ह्यात कलम १०३(१) (हत्येचा गुन्हा) भारतीय न्याय संहिता २०२३ ची वाढ करण्यात आली असून माननीय न्यायालयाला याबाबत कळविण्यात आले आहे.
फरार आरोपीचा शोध सुरू
मुख्य आरोपी वसीम अहमद पोलिसांच्या ताब्यात असला, तरी घटनेच्या वेळी त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या फरार आरोपीच्या शोधासाठी रामदासपेठ पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक रवाना करण्यात आले आहे.

पोलीस पथकाची कामगिरी
रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडाळे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि संदिप बालोद, स.पो.उप.नि. किरण गवई, पोहवा प्रविण ढगेकर, पो.हे.कॉ. सुरेश लांडे, संदिप वानखडे, पो कॉ रोशन पटले, अनिल धनभर, अभिजीत इंगळे, इमाम चौधरी, पुषोत्तम डंबेलकर, चालक सुरेद्र खंडाळे आणि पो स्टे स्टाफ यांनी ही कामगिरी बजावली.




