
नवसारीतील घरफोडी: बांधकाम सुरू असलेल्या घरातून वायर चोरणारा अमरावतीत गजाआड
त्रिमूर्ती विहार नवसारी येथील बांधकाम सुरू असलेल्या घरातून वायर चोरी करणाऱ्या आरोपीला गाडगेनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमरावती: गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती विहार, नवसारी येथे एका बांधकाम सुरू असलेल्या घरातून इलेक्ट्रिकल वायर चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश ब्राम्हणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

घटनेचा सविस्तर तपशील: फिर्यादी रवी मल्लीकार्जुन आप्पा झाडे (वय ४८ वर्ष, रा. विद्युत तांत्रीक कॉलनी, त्रिमूर्ती नगर, अमरावती) यांचे नवसारी येथील त्रिमूर्ती विहारमध्ये दोन मजली नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. ४ जुलै २०२६ च्या रात्री १०:०० वाजेपासून ते ५ जुलै २०२६ च्या दुपारी १:३० वाजेदरम्यान अज्ञात चोराने त्यांच्या घरातून फिटिंग केलेली ७५,००० रुपये किमतीची इलेक्ट्रिक वायर चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादीने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.न्या.स. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला होता.
अशी झाली आरोपीला अटक: गुन्ह्याचा तपास करत असताना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शेख अझरूद्दीन शेख कमरूद्दीन (वय २३ वर्ष, रा. गुलजार नगर, अमरावती) याला संशयित म्हणून निष्पन्न केले. शोध मोहिमेदरम्यान आरोपी ऑटोने फिरत असताना राजपूत ढाबा चौकात पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मुद्देमाल जप्त: आरोपीने चोरी केलेली वायर जाळल्यानंतर त्यातून निघालेले अंदाजे ४ किलो तांब्याचे तार (किंमत अंदाजे ८,००० रुपये) आणि गुन्ह्यासाठी वापरलेला इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा (क्र. MH 27 CW 1457, किंमत अंदाजे १,५०,००० रुपये) असा एकूण १,९८,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
यांनी केली कारवाई:

डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर ठाकरे, पोलीस अंमलदार प्रकाश मेश्राम, निलेश जुनघरे, अमोल यादव, विनोद मालवे, सिद्धार्थ शृंगारे आणि सचिन गौरखेडे यांनी केली आहे.





