चंद्रपूर LCB ची मोठी कारवाई: १८ चाकी ट्रेलरमधून ४८ गोवंशीय जनावरांची सुटका, एकास अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


चंद्रपूर LCB ची मोठी धडक कारवाई: ३५.८० लाखांच्या मुद्देमालासह ४८ गोवंशीय जनावरांची सुटका; दुर्दैवाने ९ जनावरांचा मृत्यू, एकास अटक

चंद्रपूर: गोवंशीय जनावरांच्या अवैध आणि अमानुष वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूरच्या पथकाने मोठी कारवाई करत तस्करांचे मनसुबे उधळून लावले आहेत. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजयपूर परिसरात सापळा रचून १८ चाकी ट्रेलर ट्रकमधून कोंबून नेण्यात येणारी ५७ गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, या कारवाईत एकूण ३५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?  दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, एका १८ चाकी ट्रेलर ट्रकमधून गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजयपूर परिसरात सापळा रचून संबंधित ट्रेलर ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये ५७ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून भरल्याचे निदर्शनास आले.



अमानुष वाहतुकीमुळे ९ जनावरांचा मृत्यू   तस्करांनी या जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. तसेच, त्यांना आखूड दोराने निर्दयपणे बांधून ठेवण्यात आले होते. अत्यंत कोंदट वातावरण आणि क्रूर वाहतुकीमुळे श्वास गुदमरून ९ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर पोलिसांनी उर्वरित ४८ जनावरांची सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या सर्व जनावरांना पुढील वैद्यकीय उपचार, चारा-पाणी आणि देखभालीसाठी तात्काळ पडोली (चंद्रपूर) येथील ‘प्यार फाउंडेशन’ येथे दाखल करण्यात आले आहे.



जप्त केलेला मुद्देमाल (एकूण ₹३५,८०,०००/-)



  • १८ चाकी ट्रेलर ट्रक: ₹३०,००,०००/-

  • ५७ गोवंशीय जनावरे: ₹५,७०,०००/-



  • मोबाईल फोन: ₹१०,०००/-

अटक आणि फरार आरोपींचा तपशील



  • अटक आरोपी: नईमुद्दीन करिमद्दीन शेख (वय ४० वर्षे, रा. घुग्घुस, ता. जि. चंद्रपूर)

  • फरार आरोपी: इम्रान शेख, इर्शाद खान आणि मोहम्मद साकिब मोहम्मद शकूर (तिन्ही रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) — पोलीस या तिघांचाही कसून शोध घेत आहेत.

गुन्हा दाखल व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारित) २०१५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात ब्रह्मपुरी उपविभागाच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!