
पबमधील ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड; दोघांना अटक, तिसरा फरार
नागपूर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पबमध्ये नाचणाऱ्या तरुणींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. नागपुरातील एका प्रसिद्ध पबमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री शहरातील रस्त्यांवरून संशयास्पदरित्या फिरत असलेल्या आरोपींना पोलिसांनी हटकल्याने या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे. त्यामुळं आता नागपुरातील ड्रग्ज तस्करांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील यशोधरानगर परिसरात रात्री उशिरा पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी शोएब खान जफर खान आणि सलीम शहा अयुब शहा हे एक बॅग घेवून निर्जनस्थळी थांबल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना हटकलं असता आरोपींना घटनास्थळावरून पळ काढण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तातडीनं दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यावेळी पोलिसांनी आरोपींकडून तीन लाख रुपयांचं एमडी ड्रग्स जप्त केलं आहे. शहरातील एका पबमध्ये या ड्रग्सची विक्री केली जात असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यामुळं आता नागपुरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




