
हिंगोली पोलिसांनी केला चार वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा
हिंगोली पोलिसांनी केला चार वर्षापूर्वीच्या खुनाचा उलगडा
हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोली मध्ये चार वर्षापूर्वी खळबळ उडवून देणाऱ्या वृद्ध महिलेचा झालेल्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शेळीचे पिल्ले चारण्यासाठी शेतात गेलेल्या ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा दागिण्यासाठी खून करणाऱ्या आरोपीस अखेर चार वर्षानंतर पोलिसांनी गजाआड केले असून ५६ तोळे वजनाचे चांदीचे दागिणे पोलिसांनी जप्त करून गुंगारा देणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. सेनगाव तालुक्यातील तळणी येथील मथुराबाई पांडुरंग कोरडे (वय ६५) या जानेवारी २०२० मध्ये शेळीचे पिल्ले चारण्यासाठी तळणी शिवारात गेल्या होत्या. यावेळी त्यांचा गळा आवळून खून करून आरोपीने त्यांच्या अंगावरील दागिणे काढून घेतले होते. या प्रकरणी नर्सी.ना. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना गुन्हा उघड करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, पो.स्टे नर्सी ना. हद्दीत जानेवारी २०२० मध्ये तळणी शिवारात वृध्द महिला नामे मथुराबाई पांडुरंग कोरडे (वय ६५) ही शेळी-पिल्ले चारण्यासाठी भरदुपारी तळणी शिवारातील शेतामध्ये गेली असता अज्ञात आरोपीने मथुराबाई कोरडे हिचा गळा दाबुन खुन करून अंगावरील दागदागिने काढुन घेतल्या बद्दल पो.स्टे नर्सी ना. येथे गुन्हा दाखल होता. अनेक परिश्रम करून सुध्दा सदरचा गुन्हा उघड होत नव्हता. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदर गुन्हा उघड करण्याबाबत पो.नि. विकास पाटील स्थागुशा हिंगोली व सपोनि अरुण नागरे पो.स्टे नर्सी ना. यांना सुचना दिल्या होत्या. म्हणुन पोलिसांचे पथक हे गस्तीस होते, तेव्हा गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा अशाच प्रकारचे गुन्हे करणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे नागोराव सुखदेव श्रीरामे (वय २६), रा. हानकदरी ता. सेनगाव यांनी केला आहे. अशा प्रकारच्या गोपनीय माहिती वरून पोलीस पथकाने संशयीत आरोपी नागोराव श्रीराम यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचापुस केली असता सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल करून गुन्हयातील मयत महिलेच्या अंगावरील दागदागीने चांदिचे दंडकडे व चांदिचे काकने एकुण ५६ तोळे वजनाचे वि.अं ४८,०००/- रू.चा मुद्देमाल पोलीसांना काढून दिला असुन आरोपी हा पोलीस कस्टडी मध्ये आहे. आरोपीने सदरचा गुन्हा केल्या नंतर इतर ०३ महिलांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दाग दागीने जबरीने चोरल्या बाबत गुन्हे दाखल आहेत, सदर आरोपीवर जबरीचोरी, घरफोडी, फसवणुक असे एकुण ०७ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. विकास पाटील स्थागुशा हिंगोली, सपोनि अरुण नागरे पो.स्टे नर्सी ना., सपोनि शिवसांब घेवारे, स्थागुशा हिंगोली, पोउपनि होनाजी चिरमाडे, पो.अंमलदार गोविंद गुठठे, पांडुरंग डवले, हेमंत दराडे, राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.



