
आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण..
आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण..
मुंबई – राज्याच्या गृहमंत्रालयाने राज्यभरातील तुरुंगातील कँटिनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत नव्याने १७३ पदार्थांची भर टाकली आहे. विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पाण्यासारखी डाळ व अर्धीकच्ची रोटी खात असलेल्या कैद्यांना तुरुंगात आता चक्क सेंद्रीय फळे, आइस्क्रिम, पाणीपुरी यां सारख्या पदार्थांची चव घेता येणार आहे. सरकारने तुरुंगातील कैद्यांसाठी जेवण बनवणाऱ्या कँन्टीनच्या यादीत १७३ पदार्थाची भर घातली आहे. मात्र या जेवणासाठी कैद्यांना पैसे मोजावे लागणार आहेत.


राज्याच्या गृहमंत्रालयाने राज्यभरातील तुरुंगातील कँटिनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत नव्याने १७३ पदार्थांची भर टाकली आहे. सरकारने नव्याने समाविष्ट केलेल्या पदार्थामध्ये चाट मसाला, आईस्क्रीम, सेंद्रिय फळं, पीनट बटर, पाणीपुरी, आर्ट बुक्स, कलरिंग मटेरियल लोणचं, ताजं पाणी, चेस बोर्ड, ओट्स, कॉफी पावडर, लोणावळा चिक्की, शुगर फ्री स्वीटनर या वस्तूंची भर टाकली आहे.

या खाद्य पदार्थाबरोबरच फेस वॉश, हेअर कलर इत्यादी पर्सनल केअरच्या वस्तुही पुरवण्यात येणार आहेत. कैद्यांचे बिडी सिगारेटचे व्यसन कमी करण्यासाठी निकोटीनच्या गोळ्या देण्याचीही तुरुंग प्रशासनास परवानगी आहे. कैद्यांना विविध अन्न पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आता कारागृहातील कैद्यांनाही पौष्टिक आहार मिळणार आहे.

कैद्यांना चांगल्या आहारासोबतच कारागृहातून आपल्या कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची सुविधाही लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. सरकारकडून परवानगी मिळताच राज्यातील सर्व कारागृहामध्ये कैद्यांना कुटुंबीयांशी बोलण्यासाठी फोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. कैद्याला त्याच्या कुटुंबीयांशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटापर्यंत बोलण्याची संधी दिली जाणार आहे. यापूर्वी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट कार्ड देऊन नातेवाईक किंवा वकिलाशी आठवड्यातून एकदा दहा मिनिटे बोलण्याची मुभा देण्यात आली होती, त्याचा चांगला फायदा दिसून आला. त्यानंतर आता ही सुविधा सर्व कारागृहातील कैद्यांना उपलब्ध करुन दिली जाणार आहे.


