
फेसबुकवरून महिलेकडे शरीर सुखाची मागणी; गुन्हा दाखल…
फेसबुकवरून महिलेकडे शरीर सुखाची मागणी; गुन्हा दाखल…
मुंबई – फेसबुक फ्रेंड असणाऱ्या व्यक्तीने एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. ही बाब सदर महिलेच्या पतीला कळताच त्याने आरोपीला पुन्हा असं कृत्य न करण्याची तंबी दिली. मात्र यामुळे आरोपीला राग आला आणि त्याने महिलेच्या पतीवर चाकूने हल्ला केल्याची घटना मुंबईत घडली आहे.


भांडुप पूर्वेत राहणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने शुक्रवारी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टमधून त्याने चुंबन आणि शरीरसुखाची मागणी केली होती. सदर महिला आणि तिचा पती हे दोघेही एकच मोबाईल वापरत असल्याने आरोपीने टाकलेली फेसबुक पोस्ट पतीच्याही नजरेस आली. आरोपी ओळखीचा असल्याने महिला आणि तिचा पती आरोपीच्या घरी गेले. मात्र तिथं जाताच आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेच्या पतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पीडित महिला लग्नाआधी २०१५ ते २०२१ या दरम्यान आपल्या आजीसोबत उल्हासनगर इथं वास्तव्यास होती. तिथंच तिचा आरोपीशी संपर्क आला होता. त्यानंतर दोघे फेसबुकवर फ्रेंड झाले. मात्र या ओळखीचा गैरफायदा घेऊन आता आरोपीने फेसबुकवरून शरीरसुखाची मागणी केली आणि नंतर महिलेच्या पतीवर चाकूहल्लाही केला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.



