
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी हिसकावणारा इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड!
मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांची सोनसाखळी हिसकावणारा इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड!
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – शहरातील सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी हिसकावणाऱ्या इराणी टोळीने हैदोस घातला होता. अखेर या टोळीचा सराईत सोनसाखळी म्होरक्या मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी याला सांगवी पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून साठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मधील इतर तीन आरोपींचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे गुरव, नवी सांगवी, सांगवी या उच्चभ्रू परिसरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून इराणी टोळी पसार व्हायची. या टोळीने एकाच दिवशी दोन ठिकाणी सोनसाखळी हिसकावल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे सांगवी पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. अखेर यातील मुख्य आरोपी इराणी टोळीचा म्होरक्या मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

आरोपीकडून 60 हजारांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी इराणीला अहमदनगर तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. अहमदनगरच्या सब जेलमधून आरोपीला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेऊन इराणीचे साथीदार अब्बास सल्लू इराणी, कासिम अफसर सय्यद आणि अज्जू प्रशांत काटकर यांचा शोध पोलीस घेत आहेत.



