
नागपूर: यशोधरा नगर पोलिसांची मोठी कारवाई; १ वाहन चोरटा जेचात, ५ गुन्हे उघडकीस!

नागपूर पोलिसांची मोठी धडक कारवाई: सराईत वाहनचोरटा गजाआड; नागपुरातील विविध पोलीस ठाण्यांमधील ५ गंभीर गुन्हे उघडकीस!
-
नागपूर शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालय सतत आक्रमक भूमिका बजावत आहे. यादरम्यान, यशोधरा नगर पोलिसांनी एका कुख्यात वाहन चोराला अटक करण्यात यश मिळवले असून, या कारवाईमुळे नागपूर शहरातील तब्बल ५ गुन्हे (४ वाहन चोरी आणि १ घरफोडी) एकाच वेळी उघडकीस आले आहेत.


-
गुन्ह्याची सुरुवात आणि पोलिसांकडे तक्रार: दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान, मेहंदीबाग पॉवर हाऊस परिसरातील शिवमंदिराजवळ राहणारे फिर्यादी मनीष संतोष तिवारी (वय २२) यांनी त्यांची ४०,०००/- रुपये किमतीची ‘बजाज पल्सर’ मोटारसायकल (क्रमांक: एमएच ४९ एजी ६०८३) आपल्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही दुचाकी लांबवली. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून यशोधरा नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (भा.न्या.सं.) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

-
तांत्रिक तपास आणि आरोपीची कसून चौकशी: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन यशोधरा नगर पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कन्हैया उर्फ सोनु रामभवन शाहू (वय १९, रा. नवीन शितलामाता मंदिरजवळ, विजय नगर, कळमना, नागपूर) या संशयित तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने वाहन चोरी केल्याची कबुली दिली.

-
आरोपीच्या चौकशीतून उघडकीस आलेली गुन्ह्यांची व्याप्ती: यशोधरा नगर पोलिसांनी आरोपीकडे अधिक सखोल व कसून चौकशी केली असता, त्याने केवळ यशोधरा नगरच नव्हे, तर नागपूर शहरातील इतरही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली:
-
हुडकेश्वर पोलीस ठाणे: या हद्दीतून १,००,०००/- रुपये किमतीची ‘होंडा युनिकर्न’ (क्र. एमएच २९ एयु ४७०७) दुचाकी चोरल्याचे कबूल केले.

-
सदर पोलीस ठाणे: या हद्दीतून ९०,०००/- रुपये किमतीची ‘होंडा डिओ’ मोपेड (क्र. एमएच ३१ ईएल ९४४४) चोरली होती.
-
इमामवाडा पोलीस ठाणे: या हद्दीतून १,००,०००/- रुपये किमतीची ‘पल्सर’ दुचाकी (क्र. एमएच ३१ एफएन ०१६९) लांबवली होती.

-
कोराडी पोलीस ठाणे: वाहन चोरीसोबतच कोराडी पोलीस ठाणे हद्दीत एक घरफोडी केल्याची कबुलीही त्याने दिली.
-
-
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: पोलिसांनी आरोपीकडून एकूण ४ दुचाकी वाहने हस्तगत केली असून, त्यावरून ३,३०,०००/- रुपयांचा मुद्देमाल यशस्वीरीत्या जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून इतर काही गुन्हे उघडकीस येतात का, या दृष्टीने यशोधरा नगर पोलिसांकडून पुढील कसून तपास सुरू आहे.
-
पोलीस अधिकारी व मार्गदर्शक पथक: ही यशस्वी व धडक कारवाई नागपूर शहरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सह. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण प्रभाग) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (परि.क्र. ५) नित्यांद झा आणि सहा. पोलीस आयुक्त (कळमना विभाग) रोहीत ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या तपास पथकात यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे वपोनि. युनुसचॉद शेख, दुपोनि. विवेकानंद भारती, पोउपनि. अनंत पाटील, तसेच अंमलदार पोहवा. राहुल बोंदरे, अशोक तायडे, पोअं. मनिष झरकर, संदीप वानखेडे, शितेष चौरसिया, भुषण येरोजवार व प्रविण ईनवाते यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.



