
परभणी: स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडीच्या ९ गुन्ह्यांची उकल; विधीसंघर्षग्रस्त बालकासह आई ताब्यात

परभणी पोलिसांची मोठी कारवाई: स्थानिक गुन्हे शाखेकडून घरफोडी व चोरीच्या ०९ गुन्ह्यांची उकल; विधीसंघर्षग्रस्त बालकासह आई ताब्यात
परभणी (विशेष बातमीदार):
परभणी जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि अशा गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत एकूण ०९ घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेण्यात आले असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


चौकशीत चोरीचे गुन्हे उघडकीस, मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बालकाला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर तीन साथीदारांच्या साह्याने जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली.

गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत अधिक चौकशी केली असता, त्याच्या हिश्याला आलेला चोरीचा मुद्देमाल त्याच्या आईने (लक्ष्मीबाई भोसले) दोन पंचांसमक्ष पालामधून काढून पोलिसांच्या हवाली केला.

पुढील कायदेशीर कारवाई
ताब्यात घेण्यात आलेला विधीसंघर्षग्रस्त बालक आणि त्याची आई लक्ष्मीबाई भोसले यांना जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे नवामोंढा येथे हजर करण्यात आले आहे. या टोळीतील इतर तीन फरार साथीदारांचा शोध पोलीस गांभीर्याने घेत असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून दर्गा रोड परिसरात छापा
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत सर यांच्या स्पष्ट निर्देशांनुसार, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले साहेब आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जिल्हाभरात संशयितांचा माग काढणे सुरू केले होते.
तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून पथकाला अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, एक विधीसंघर्षग्रस्त बालक आपल्या इतर ३ साथीदारांच्या मदतीने परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत घरफोड्या करत आहे.

या बातमीच्या आधारे पथकाने तत्काळ दर्गा रोड परिसरातील जामकर विद्यालयाच्या पाठीमागील मैदानात असलेल्या पाल (तात्पुरता निवारा) टाकलेल्या ठिकाणी छापा टाकला. तेथे सदर विधीसंघर्षग्रस्त बालक आणि त्याची आई लक्ष्मीबाई भोसले हे मिळून आले.




