
पिस्तुलाचा धाक दाखवून पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार; गुन्हा दाखल
पुणे : शहर पोलीस दलातील एका महिला पोलीस शिपायासोबत लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून घरी जेवायला जाऊन कोल्ड्रींकमधून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर पोलीस शिपायाने सातत्याने बलात्कार केला, त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी सुध्दा दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही शहर पोलीस दलात नेमणूकीला असून स्वारगेट पोलीस वसाहतीत राहतात. लॉकडाऊनच्या कालावधीत आरोपी दीपक मोघे याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढविली. या काळात त्यांच्या घरी जेवणास तो जात होता. त्या दरम्यान त्याने कोल्ड्रींकमधून फिर्यादीला गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे फिर्यादीस उलट्यांचा त्रास होऊ लागला. तेव्हा त्याने फिर्यादीला गोळ्या खाण्यास दिल्या. त्यामुळे आणखी गुंगी येऊन त्यांना झोप लागली. तेव्हा त्याने फिर्यादीसोबत शारीरीक संबंध केले. त्याचा व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी दिली.


तसेच फिर्यादीच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पिस्तुलाचा धाक दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. फिर्यादीच्या घरातील कपाटातील ५ ते ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डोंगल व मोबाईल अशा सर्व वस्तू जबरदस्तीने घेऊन गेला. अशी तक्रार फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिली. त्या नुसार दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला.



