
वर्ध्यात वाहतूक पोलिसांचे विद्यार्थ्यांना धडे; ४०० NCC विद्यार्थ्यांनी घेतली नियम पाळण्याची प्रतिज्ञा
वर्धा: वर्धा जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघात आणि त्यामध्ये होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल सर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक शाखेला दिल्या आहेत.
या सूचनेनुसार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि सहाय्यक फौजदार जावेद खान यांनी बापूराव देशमुख कॉलेज, सेवाग्राम येथील एनसीसी (NCC) कॅम्पला भेट दिली. यावेळी उपस्थित ४०० एनसीसी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना दिलेले महत्त्वाचे संदेश आणि मार्गदर्शन:
-
एनसीसीचे महत्त्व आणि शिस्त: विद्यार्थ्यांनी देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य दिले पाहिजे. एनसीसीच्या ट्रेनिंगमध्ये शिस्त आणि अनुशासनाला अत्यंत महत्त्व असून, नियमित परेड व व्यायामाद्वारे शारीरिक क्षमता वाढवावी. या कडक प्रशिक्षणाचा फायदा आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये निवड होण्यासाठी होतो. यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच कठोर परिश्रम घेऊन जिल्ह्याचा गौरव वाढवावा, असे आवाहन पोलिसांनी केले.

-
वाहतूक नियमांचे पालन: वाहन चालवण्यापूर्वी आरटीओ (RTO) कडून रीतसर ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) मिळवणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी कधीही अतिवेगाने वाहन चालवू नये, दुचाकी चालवताना अनिवार्यपणे हेल्मेटचा वापर करावा, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे टाळावे आणि कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये.
-
आपत्कालीन मदत क्रमांक: रस्त्यावर अपघात झाल्यास त्वरित मदतीसाठी रुग्णवाहिकेकरिता १०८ वर कॉल करावा. तसेच इतर पोलीस मदतीसाठी टोल फ्री क्रमांक ११२, महिला हेल्पलाईन १०९१ आणि बालकांच्या मदतीसाठी १०९८ चा वापर करावा.

-
सामाजिक सुरक्षा व सायबर सुरक्षा: याप्रसंगी मुलींच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या विविध कायदेशीर कलमांची माहिती देण्यात आली, तसेच ‘गुड टच-बॅड टच’ बाबत मार्गदर्शन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी अनोळखी फोन कॉलवर आपल्या बँकेची कोणतीही माहिती शेअर करू नये, असेही पोलिसांनी सांगितले. याशिवाय, समाजात कुठेही दारू, जुगार किंवा अमली पदार्थांची अवैध विक्री होत असल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले.
वाहतूक सुरक्षा प्रतिज्ञेने समारोप: कार्यक्रमाच्या शेवटी सर्व एनसीसी विद्यार्थ्यांनी ‘अपघातमुक्त जीवन जगणे आणि अपघाताच्या वेळी गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणे’ याविषयी सामूहिक प्रतिज्ञा घेतली.

या यशस्वी उपक्रमाबद्दल एनसीसीचे डीआय (DI) श्री. गणेश डोईफोडे सर यांनी वाहतूक पोलिसांचे आभार मानले. त्यांनी पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या टीमला पुष्पगुच्छ आणि मोमेंटो (स्मृतीचिन्ह) देऊन सन्मानित केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. गणेश डोईफोडे सर आणि कॉलेज प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.
– विलास पाटील पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वर्धा.




