
अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तरुणीच्या खून प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात आढळून आलेल्या एका अज्ञात तरुणीच्या जळालेल्या मृतदेहाच्या खळबळजनक खून प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्याच नातेवाईकाला अटक करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जंगल परिसरात आढळला जळालेला मृतदेह
दिनांक 2 जून 2026 रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विदर्भ महारोगी सेवा मंडळाच्या तपोवन संस्थेजवळील जंगल परिसरात एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. याबाबत गाडगेनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी विशेष पथके नियुक्त केली होती.

300 हून अधिक CCTV फुटेजची तपासणी
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेने चार विशेष पथके तयार केली. तपासादरम्यान पोलिसांनी अमरावती शहर व ग्रामीण भागातील हरवलेल्या महिलांची माहिती गोळा केली. तसेच गुप्त माहितीदारांचे जाळे सक्रिय करून विविध ठिकाणांहून माहिती संकलित करण्यात आली.
घटनास्थळ व परिसरातील 300 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, माहिती संकलन आणि सातत्यपूर्ण तपासाच्या आधारे मृत महिलेची ओळख काजल जितेंद्र इंगळे (वय 22 वर्षे), रा. विश्रोळी, ता. चांदूर बाजार, सध्या तेजस विहार, राजुरा, अमरावती अशी पटली.

मृत तरुणीच्या नातेवाईकानेच केला खून
तपासादरम्यान पोलिसांनी संशयित चेतन सुनील थोरात (वय 23 वर्षे), रा. तेजस विहार, राजुरा, अमरावती याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्याने खून केल्याची कबुली दिली.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीची ओळख पटू नये यासाठी तिच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच मृत महिलेचा मोबाईल आणि इतर वस्तू पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिल्याचेही उघड झाले आहे. संबंधित वस्तू जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी संयुक्तरीत्या केली. अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक असलेल्या या प्रकरणाचा अल्पावधीत उलगडा केल्याबद्दल गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




