
MCOCA गुन्ह्यातील फरार आरोपीला पाचगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या; गोवंश तस्करी प्रकरणातील टोळीचा पर्दाफाश!
नागपूर: नागपूर ग्रामीण जिल्हा अंतर्गत येणाऱ्या भिवापूर पोलीस स्टेशन हद्दीत ‘मकोका’ (MCOCA – महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९) अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या टोळीतील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. अजय धनराज चौधरी (वय २९ वर्षे, रा. नागरटोली, ता. भिवापूर, जि. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पाचगाव पोलिसांनी चांपा टोल नाका येथे सापळा रचून ही कारवाई केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध रित्या गोवंश जनावरांची कत्तलीसाठी तस्करी व वाहतूक करणाऱ्या टोळीविरुद्ध गुन्हा नोंद आहे. या टोळीचा प्रमुख आणि सदस्यांसह एकूण ५ आरोपींच्या टोळीविरुद्ध ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. या टोळीचा प्रमुख श्रीकांत यादवराव चौधरी (वय २७ वर्षे, रा. नागरटोली, ता. भिवापूर) हा आहे.

अपघातानंतर उघडकीस आले होते रॅकेट: दिनांक ०५/०२/२०२६ रोजी भिवापूर पोलीस स्टेशन येथे एका अपघाताची नोंद झाली होती. टाटा कंपनीचे झेनॉन पिकअप वाहन (क्र. एम.एच. ३४ ए.बी. ६९६४) चा चालक श्रीकांत उर्फ छोटू यादवराव चौधरी (वय २९ वर्षे) हा आपल्या वाहनाच्या डाल्यामध्ये ०८ गोवंश जनावरांची कोणतीही चारा-पाण्याची सोय न करता, अत्यंत कमी जागेत दाटीवाटीने कोंबून वाहतूक करत होता. जनावरांचे शिंग आणि पाय दोरीने निर्दयीपणे बांधण्यात आले होते. कत्तलीकरिता ही अवैध वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ ड वरील मानोराज शिवार येथील भिवापूर ते उमरेडकडे जाणाऱ्या रोडने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे केली जात होती.
दरम्यान, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाला वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात काही जनावरे गंभीर जखमी झाली, तर काहींचा जागीच मृत्यू झाला होता.

पोलिसांची कडक कारवाई आणि गुन्हे दाखल
या प्रकरणी भिवापूर पोलीस ठाण्यात अप.क्र. ७८/२६ अन्वये भा.न्या.सं. च्या कलम ३२५, २८१(१), तसेच प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१), (ड), (ई), (फ) आणि महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम ५, ९ व म.पो.का. कलम ११८ सह कलम ३(१)(ii), ३(२), ३(४) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) सन १९९९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वीच टोळीप्रमुख श्रीकांत यादवराव चौधरी यांच्यासह खालील आरोपींना अटक केली होती: १) श्रीकांत यादवराव चौधरी (टोळीप्रमुख, वय २७, रा. नागरटोली) २) प्रफुल उर्फ भोला हेमराज चौधरी (वय २३, रा. नागरटोली, ता. भिवापूर, जि. नागपूर) ३) नामदेव गोपीचंद सतीबावणे (वय ३८, रा. आमगाव, ता. पवनी, जि. भंडारा)

फरार आरोपीला अशी झाली अटक
या गुन्ह्यातील एक मुख्य आरोपी अजय धनराज चौधरी हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार होता. दिनांक ११/०६/२०२६ रोजी सकाळी पाचगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, मकोका गुन्ह्यातील पाहिजे असलेला हा आरोपी भिवापूरवरून नागपूरच्या दिशेने जात आहे.
माहिती मिळताच पाचगाव पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून चांपा टोल नाका येथे कडक नाकाबंदी केली. आरोपी त्या परिसरात येताच पोलिसांनी हुशारीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. आरोपी अजय चौधरी याला अधिकृतपणे अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.





