
चांदूर बाजार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मध्य प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार २४ तासांच्या आत जेबीबंद!

माध्यम विशेष वृत्त: चांदूर बाजार पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मध्य प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार २४ तासांच्या आत जेबेबंद!
चांदूर बाजार (अमरावती):
चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी करणाऱ्या एका कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या या गुन्हेगाराकडून पोलिसांनी चोरीस गेलेला ७० हजार रुपये किमतीचा ऑटो हस्तगत केला असून, या कारवाईमुळे वाहन चोरांचे धाबे दणाणले आहेत.


नेहमीच्या स्टाईलने घडली घटना:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदूर बाजार येथील कसाबपुरा भागात राहणारे दानिश खान जमीर खान यांचा मॅक्सीमा कंपनीचा ऑटो (क्रमांक: MH 49 AR 5712 – किंमत अंदाजे ७०,००० रुपये) दिनांक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास आठवडी बाजार परिसरातील ऑटो स्टॉपवरून अज्ञात चोरट्याने लांबवला होता. या प्रकरणी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार अपहर व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांचे विशेष पथक आणि फिल्मी स्टाइल सापळा:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे ठाणेदार आधारसिंग सोनोने यांनी त्वरित एक विशेष तपास पथक तयार केले. तपासादरम्यान पोलीस पथकातील अंमलदारांना गुप्त बातमीदाराकडून पक्की खबर मिळाली की, चोरी गेलेला ऑटो आणि आरोपी सध्या वलगाव हद्दीत फिरत आहेत.

माहिती मिळताच पोलिसांनी तत्परता दाखवत वलगाव (अमरावती) येथे छापा टाकला. यावेळी आरोपी आशिष उर्फ अक्षय उर्फ बिसलेरी मानिक उईके (वय २१ वर्षे, रा. लहास, ता. भैंसदेही, जि. बैतूल, मध्य प्रदेश) हा चोरीच्या ऑटोसह पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करत आरोपीला जेरबंद केले.
पोलीस प्रशासनाचे यश:
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि पोलीस उपअधीक्षक माधवराव गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या नेतृत्वाखालील पथकातील कर्मचारी रवींद्र बावणे, आशिष राऊत, जितेश सावरकर आणि वैभव आकोटकर यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या पोलीस या गुन्हेगाराची कसून चौकशी करत असून, त्याच्याकडून इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




