
देवलापार पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांच्या गांजा तस्करीतील दोन आरोपी उत्तर प्रदेशातून जेरबंद
१२५.६६५ किलो गांजा तस्करी प्रकरण: गांजा पुरवठा करणारे दोन आरोपी प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथून अटक; देवलापार पोलिसांची मोठी कामगिरी
देवलापार: नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, आणि रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली देवलापार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे.

२६ जून २०२६ रोजी देवलापार पोलिसांनी धडक कारवाई करत १२५.६६५ किलो गांजा आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेली कार, असा एकूण ३५,१३,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी आरोपींविरुद्ध देवलापार पोलीस ठाण्यात कलम ८(क), २०(ब)(ii)(सी), २९ एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्य पुरवठादार उत्तर प्रदेशातून जेरबंद वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात देवलापार पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे आणि सातत्यपूर्ण शोध मोहिमेच्या आधारे २८ जून २०२६ रोजी या गुन्ह्यातील मुख्य कारचालक आणि पाहिजे असलेला आरोपी इमरान मो. हनीफ खान (वय ३८ वर्षे, रा. लोकमान्य नगर बस स्टॉपजवळ, ठाणे शहर, जि. ठाणे) याला खवासा बॉर्डर परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. तो गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या होंडा सिटी कार (क्रमांक युपी १६ एपी २०४३) चा चालक होता.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून साखळी पुरावे जोडले. तपासादरम्यान गांजाचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींचा माग काढत पोलीस थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पोहोचले. १ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी खिरी (प्रयागराज) पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागातून खालील दोन आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली:
१) अमीतकूमार उर्फ अमित अवधेशसिंह पटेल (वय ३२ वर्षे, रा. लालतारा/गोसाईतारा, ता. मेजा, जि. प्रयागराज)

२) आंशीक उर्फ गोलु विजयप्रकाश विश्वकर्मा (वय ३० वर्षे, रा. सिरहिर, तह. मेजा, जि. प्रयागराज)
अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ४ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड (PCR) मंजूर केली आहे. देवलापार पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.





