
स्थानिक गुन्हे शाखा , गोंदिया पथकाची अवैध दारू वाहतूक विरोधात उत्कृष्ठ कारवाई
गोंदियात मध्यप्रदेशातून होणारी अवैध दारू वाहतूक उघडकीस; १२ लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक
गोंदिया: मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैध दारूची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटवर गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाडसी कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रचलेल्या सापळ्यात २ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून विटारा ब्रीझा कार, बनावट स्टिकर्स, आयफोन आणि दारू असा एकूण १२,००,९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी कारवाई कशी झाली?
गोंदिया पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या सूचनेनुसार, जिल्ह्यात आणि इतर राज्यांतून होणाऱ्या अवैध दारू तस्करीविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक १६ ऑगस्ट २०२६ रोजी सालेकसा परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, ग्राम टेंभूटोला ते पिपरीया मार्गाने एका चारचाकी वाहनातून मध्यप्रदेशातून विनापरवाना दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी टेभूटोला ते पिपरीया रस्त्यावर तात्काळ सापळा रचला. संशयास्पद पांढऱ्या रंगाची विटारा ब्रीझा कार अडवून पाहणी केली असता, कारच्या डिक्कीमध्ये रॉयल स्टँग व्हिस्कीचे बॉक्स आढळून आले.
बनावट स्टिकर्सचा खेळ
आरोपींची अधिक चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. मध्यप्रदेशातील लांजी बाजारातून दारू आणि बिअरची खरेदी करून, त्यावरचे मूळ स्टिकर्स काढून त्याऐवजी बनावट “Maharashtra State only” असे स्टिकर्स लावले जात होते. ही दारू टेंभूटोला येथील एका घरात साठवून पुढे ब्रीझा कारने वर्ध्याला नेण्याची त्यांची योजना होती.

जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹१२,००,९८०/-)
-
दारू व बिअर: रॉयल स्टँग व्हिस्की (१८० मि.ली.) आणि किंगफिशर बिअरचे ३४ बॉक्स (६९५ नग) – किंमत ₹२,७३,९१०/-
-
वाहने व इतर: १ मारुती विटारा ब्रीझा कार – किंमत ₹८,००,०००/-

-
इलेक्ट्रॉनिक्स: १ अॅपल (Apple) कंपनीचा आयफोन – किंमत ₹५०,०००/-
-
साहित्य: बनावट स्टिकर्स व इतर साहित्य – किंमत ₹७७,०७०/-
अटक करण्यात आलेले आरोपी
१. संजय सदाशिव राऊत (वय ५१ वर्षे, रा. श्रीराम कॉलनी, वॉर्ड क्र. ६, बोरगाव मेघे, जि. वर्धा)
2.योगेश गोपाल पांडे (रा. बोरगाव मेघे, जि. वर्धा)
दोन्ही आरोपींविरुद्ध सालेकसा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक
ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा विठ्ठलप्रसाद ठाकरे, संजय चव्हाण, सोमेंद्रसिंग तुरकर, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन आणि पोशी हंसराज भांडारकर यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




