
दुकानाचा शटर फोडून झालेली चोरी उघड; उमरेड पोलिसांची कामगिरी
उमरेड शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या एका नामांकित किराणा दुकानाचे शटर तोडून रोख रक्कम आणि चांदीचा ऐवज लंपास करणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा उमरेड पोलिसांनी यशस्वीपणे पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक तपासाच्या आधारे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला (नाबालिगाला) ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चोरीतील शिल्लक रोकड जप्त करण्यात आली आहे.
तक्रारदार अनिलकुमार टिकमदास गोविंदानी यांचे उमरेड येथील इतवारी पेठ या मुख्य बाजारपेठेच्या भागात ‘अनिल ट्रेडर्स’ नावाचे किराणा दुकान आहे. दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री ११:०० वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते.

त्यानंतर ६ जुलै २०२६ च्या पहाटे ४:४५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचा लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने गल्ल्यातील रोख रक्कम आणि चांदीचा मौल्यवान ऐवज चोरून पळ काढला. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती.
पोलीस कारवाई आणि तपास चक्र
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रारदार गोविंदानी यांच्या फिर्यादीवरून उमरेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी घटणास्थळावरील तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीचे विश्लेषण केले. तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत या गुन्ह्यात एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा त्याच्या इतर साथीदारांसह सहभाग असल्याचे पोलिसांच्या निष्पन्न झाले.
ताबा आणि मुद्देमाल जप्ती
२ सप्टेंबर २०२६ रोजी पोलिसांनी सापळा रचून संबंधित विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सखोल चौकशीदरम्यान त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने सदर दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या रकमेच्या वाटणीतून त्याच्या वाट्याला आलेल्या रकमेपैकी शिल्लक राहिलेली ₹१,८००/- ची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणातील इतर फरार साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली कामगिरी
सदर यशस्वी कामगिरी नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उमरेड उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली उमरेड पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.





