
बनावट नायब तहसीलदार बनून फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अकोला पोलिसांकडून अटक
अकोला: पुनर्विवाहाच्या शोधात असलेल्या एका महिला गृहिणीची ‘नायब तहसीलदार’ असल्याचा बनावट आव आणून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अट्टल भामट्याला सिव्हिल लाईन पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
व्हॉट्सॲप ग्रुपवरून संपर्क अन् लग्नाचे आमिष: मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, न्यु तापडीया नगर, अकोला येथील रहिवासी असलेल्या प्रिती इर्शद शेख उर्फ प्रिती प्रशांत बोरकर (वय ४१ वर्षे) यांनी पुनर्विवाहासाठी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर स्वतःचा बायोडाटा प्रसिद्ध केला होता. हा बायोडाटा पाहून आरोपी संदीप उर्फ सुवर्णदीप पुरुषोत्तम वानखडे (वय ३९ वर्षे, रा. पातुर्डा, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा) याने फिर्यादीशी संपर्क साधला. आपण महसूल विभागात ‘नायब तहसीलदार’ पदावर कार्यरत असल्याचे सांगून त्याने बनावट ओळखपत्र (Identity Card) दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.

लग्न करून फसवणूक: विश्वास संपादन केल्यानंतर आरोपीने फिर्यादीसोबत धार्मिक पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर सुमारे दोन महिने सोबत राहून विविध कारणांसाठी फिर्यादीकडून एकूण १,८०,०००/- रुपये उकळले. काही दिवसांनी आरोपीची फसवणूक उघडकीस आल्यानंतर फिर्यादीने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.
भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल: फिर्यादीच्या जबाबावरून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आरोपी संदीप वानखडेविरुद्ध अंतर्गत भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक विश्लेषणाने आवळल्या मुसक्या: गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपी फरार झाला होता. सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि सर्व्हेलन्सच्या आधारे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर आरोपीच्या मूळ गावी, म्हणजेच मु.पो. पातुर्डा (जि. बुलढाणा) येथे छापा मारून त्याला ताब्यात घेण्यात आले व रीतसर अटक करण्यात आली.
४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी: अटक केलेल्या आरोपीला अकोला येथील माननीय जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीला ०४ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी (P.C.R.) सुनावली आहे. या काळात आरोपीने इतर कुणाची अशीच फसवणूक केली आहे का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

कारवाई करणारे पथक:
सदर धडक कारवाई अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक रेड्डी, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मालती कायटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन घाटोळे व श्याम तोंडे यांनी पार पाडली.





