
रिक्षा प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी जळगावची टोळी जेरबंद; १५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त
पुणे (समर्थ पोलीस ठाणे): रिक्षाने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सावज बनवून हातचालाखीने त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचे तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून टोळीतील ३ आरोपींना अटक केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी आणि गुन्हा :-

दिनांक १४ जून २०२६ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास एका महिला ज्येष्ठ नागरिक पावर हाऊस चौक ते भवानी पेठ दरम्यान ऑटोरिक्षाने प्रवास करत होत्या. त्यावेळी रिक्षात असलेल्या चार भामट्यांनी संगनमत करून महिला फिर्यादी यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (चैन) लांबवली. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा (रजि. क्र. १७५/२०२६) दाखल करण्यात आला होता.
पोलीस तपास आणि आरोपींना अटक:-

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तपास सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही टोळी जळगाव येथील असून पुण्यातील वयोवृद्ध प्रवाशांना एकटे गाठून त्यांच्याकडील मौल्यवान ऐवज चोरत असल्याचे निष्पन्न झाले.
तपासाच्या आधारे पोलिसांनी खालील आरोपींच्या मुसक्या आवळल्या:

-
शाकीर जाकीर तेली (वय २९, रा. संतोष नगर, कात्रज, पुणे) – याला ०१ जुलै २०२६ रोजी अटक करण्यात आली.
-
मोसीन खान नुर खान (वय ३१, रा. गेंदालाल मील, जळगाव)

-
इस्माईल उर्फ राजू शब्बीर शेख (वय ५०, रा. एकता हॉलच्या मागे, जळगाव)
आरोपी मोसीन खान आणि इस्माईल शेख हे मालधक्का चौक, पुणे येथे पुन्हा असाच गुन्हा करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ०२ सप्टेंबर २०२६ रोजी जाळ्यात पकडून अटक केली. (टोळीतील ‘गणेश उर्फ मेमरी’ (रा. जळगाव) नावाच्या आरोपीचा शोध सुरू आहे).
इतर गुन्ह्यांची कबुली व मुद्देमाल जप्त :-
अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पुणे शहरातील सिंहगड रोड, काळे पडळ, वानवडी, बंडगार्डन तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातही अशाच प्रकारचे चोऱ्यांचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून १५,००,००० रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार (१००३) शेख करत आहेत.
तपास पथक :-
ही यशस्वी कामगिरी पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संजय सराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-०१) कृषीकेश रावले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सपोफौ पागार, पोलीस हवालदार रोहिदास वाघेरे, इम्रान शेख, औचरे, शिवा कांबळे, अमोल गावडे, महिला पोलीस हवालदार गंगावणे तसेच पोलीस शिपाही अविनाश दरवडे, चौधरी आणि यादव यांनी सहभाग घेतला.




