
आर्वीत पोलिसांची धडक कारवाई: ५ किलो गांजासह २,२८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त, नागपूरहून गांजा आणणारा तस्कर जेरबंद

वर्धा (दि. ३१ ऑक्टोबर २०२६): वर्धा जिल्ह्यातील आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नागपूरहून मोपेड गाडीवरून गांजा आणणाऱ्या एका तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ५ किलो गांजासह २ लाख २८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घटना नेमकी कशी घडली?
वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस स्टेशनला दिले होते. त्या अनुषंगाने, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी आर्वी पोलिसांना खबऱ्यामार्फत अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, दाऊतनगर, आंबेडकर वार्ड येथील रहिवासी असलेला शेख गुड्डू शेख आशिक हा नागपूर येथून आपली मोपेड गाडीने गांजा अंमली पदार्थ चिल्लर विक्रीसाठी आर्वी येथे घेऊन येत आहे.

या माहितीच्या आधारे आर्वी ते वर्धा रोडवरील एस. टी. डेपोसमोर पोलीस स्टाफ, पंच, महसूल विभागाचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमने संयुक्तपणे सापळा रचला. काही वेळानंतर एक संशयित मोपेड वाहन आल्याचे दिसून आल्यावर पोलिसांनी ते थांबवले. वाहन चालकाची चौकशी केली असता, तो शेख गुड्डू शेख आशिक (वय ४३ वर्षे) असल्याचे निष्पन्न झाले.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
पंचांसमक्ष वाहनाची आणि चालकाची झडती घेतली असता, वाहनावरील एका शालेय बॅगेत प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला. मौकेवर जप्ती पंचनामा करून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:

-
निव्वळ गांजा (४.९१० किलो): किंमत ९८,२०० रुपये
-
टी.व्ही.एस. कंपनीची एनटॉर्क (NTORQ) मोपेड गाडी (विना क्रमांकाची): किंमत १,२०,००० रुपये

-
विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट: किंमत १०,००० रुपये
-
नायकी (NIKE) कंपनीची काळी बॅग: किंमत ५०० रुपये

-
प्लास्टिक पन्न्या: किंमत २० रुपये
-
एकूण जप्त मुद्देमाल: २,२८,७२० रुपये
गुन्हा दाखल व पुढील तपास
आरोपी शेख गुड्डू शेख आशिक याच्याविरुद्ध आर्वी पोलीस स्टेशनमध्ये कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास आर्वी पोलीस करीत आहेत.
कारवाई करणारे पथक
सदरची ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे, पोलीस हवालदार निलेश पेटकर, मंगेश वाघाडे, तसेच पोलीस अंमलदार सुरज मेंढे, आकाश चोरपगार, रोशन टेंभरे आणि बाबासाहेब गवळी (सर्व नेमणूक पोलीस स्टेशन आर्वी) यांनी पार पाडली.



