अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर हिंगणघाट पोलिसांचा छापा; एक जण अटकेत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


हिंगणघाट (वर्धा) दिनांक १९ ऑक्टोबर २०२६:

हिंगणघाट शहरात अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हिंगणघाट येथील एका आरोपीच्या घरात छापा टाकून तब्बल ३८६ ग्रॅम गांजा जप्त केला असून, एन.डी.पी.एस. ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली आहे.



अशी हिंगणघाट पोलिसांची कारवाई:

दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगतीकरण पथकाचे (डि.बी. पथक) पोलीस उपनिरीक्षक अतुल स्थूल, पोलीस हवालदार प्रशांत ठोबरे आणि इतर अंमलदार हिंगणघाट पोलीस स्टेशन परिसरात अवैध धंद्यांवर पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, विरभागत सिंग वॉर्ड, हिंगणघाट येथे राहणारा अरुण कुडची हा आपल्या राहत्या घरी विक्रीच्या उद्देशाने अंमली पदार्थ (गांजा) बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती मुखबिराकडून मिळाली. माहिती देणाऱ्याने आरोपीने काळ्या रंगाचा डिझाईनचा शर्ट व काळी पँट घातल्याचेही सांगितले होते.

ही गोपनीय माहिती तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशानुसार पोलिसांनी पंचासमक्ष, फॉरेन्सिक टीम, मापारी व पोलीस स्टाफसह विरभागत सिंग वॉर्ड येथील अरुण कुडची याच्या घरी छापा टाकला.



घरातून जप्त झाला गांजा:

पोलिसांनी पंचांसमोर घरी उपस्थित असलेल्या इसमाची विचारपूस केली असता, त्याने आपले नाव अरुण अनिल कुडची (वय २१ वर्षे, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट, जि. वर्धा) असल्याचे सांगितले.
पंचांसमक्ष त्याच्या घराची कायदेशीर झडती घेतली असता, घरातील सज्जावर एका लाल रंगाच्या थैलीतील प्लास्टिक पिशवीमध्ये हिरवट-काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या व बिया असलेली ओलसर वनस्पती (गांजा) मिळून आली. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पंचांसमक्ष वजन केले असता ३८६ ग्रॅम गांजा व पिशवीसह एकूण १८,८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुन्हा दाखल व पुढील तपास:

या प्रकरणी आरोपी अरुण अनिल कुडची याच्या विरोधात हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. ॲक्ट (NDPS Act) कायद्यान्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे.



सदर धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या सूचनेनुसार सपोनी अतुल स्थूल, पोलीस हवालदार प्रशांत ठोबरे, पो.ना. राजेश शेंडे, पो.शि. आशिष नेवारे व पो.शि. मंगेश वाघमारे यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पी.एस. सोनकुसरे करीत आहेत.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!