
तळेगाव दशासर पोलिसांची कारवाई: ५५० किलो अल्युमिनियम तार चोरीचा गुन्हा उघड, तिघे जेरबंद!

तळेगाव दशासर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या देवगाव परिसरातून तब्बल २ लाख ४२ हजार रुपये किमतीची अल्युमिनियम विद्युत तार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी तपास करत तळेगाव दशासर पोलिसांनी अल्पावधीतच तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेल्या तारेसह रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने असा एकूण २ लाख ५२ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
-
तक्रारदार व कंपनी: फिर्यादी यांनी ‘रिलायबल एंटरप्रायझेस कंपनी’ (जिल्हा परिषद महावितरण) अंतर्गत देवगाव येथील ३३ केव्ही विद्युत वाहिन्यांच्या उभारणीचे काम पूर्ण केले होते.


चोरीचे स्वरूप: देवगाव शिवारातील १७ विद्युत पोलवरील १७०० मीटर लांबीची, ५५० किलो वजनाची आणि अंदाजे २,४२,००० रुपये किमतीची अल्युमिनियम तार (कंडक्टर) अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास लांबवली होती.

गुन्हा दाखल: याप्रकरणी फिर्यादीच्या जबाबावरून तळेगाव दशासर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार अप क्रमांक २८८/२०२६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

तपास पथक तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे कसून तपास करत असताना, पोलिसांना मोठे यश हाती लागले:
-
पहिली अटक: पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपी गजानन पुंडलिकराव अर्जुनकर (वय ३६, रा. खडकपुरा, नाचनगाव, ता. देवळी, जि. वर्धा) याचा शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

गुन्ह्याची कबुली व साखळी उघड: सखोल चौकशी दरम्यान गजानन याने साथीदार राकेश रामदास राउत (वय ३१, रा. खडकपुरा, नाचनगाव) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेली तार पुलगाव येथील भंगार व्यावसायिक रियाज खान फैयाज खान (वय ३२, रा. इंदिरानगर, पुलगाव) याला विकल्याची माहिती दिली.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राकेश राउत आणि भंगारवाला रियाज खान यांनाही ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी देखील गुन्ह्याची व माल खरेदी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे साहित्य, रोख रक्कम व वाहतुकीची साधने खालीलप्रमाणे जप्त केली आहेत:
-
अल्युमिनियम तार: ६० किलो कतार (अंदाजे किंमत ₹ २६,८२०)
रोख रक्कम: ₹ १,०५,०००
वाहन क्रमांक १: मोटारसायकल (क्र. MH 32 AQ 9521) – किंमत ₹ ६०,०००
वाहन क्रमांक २: मोटारसायकल (क्र. MH 29 AJ 4347) – किंमत ₹ ६०,०००
इतर साहित्य: तार कापण्यासाठी वापरलेला कटर – किंमत ₹ ४००
सदर उल्लेखनीय व धडाकेबाज कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश तातोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.



