गोंदिया LCB ची धडाकेबाज कारवाई: ३७ अँड्रॉइड मोबाईलसह ३ विधिसंघर्ष बालक ताब्यात!

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


गोंदिया लोकल क्राईम ब्रँचची धडाकेबाज कामगिरी: ३७ अँड्रॉइड मोबाईल जप्त, चोरट्यांचा पर्दाफाश!

गोंदिया:



जिल्ह्यात घरफोडी आणि चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांवर गोंदिया पोलीस दलाने जोरदार वचक निर्माण केला आहे. गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीत एका मोबाईल दुकानाचे शटर तोडून तब्बल ३७ अँड्रॉइड मोबाईल लांबवणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (LCB), गोंदिया च्या पथकाने अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ३ विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ५,25,000/- रुपये किमतीचे ३७ वेगवेगळे अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दिनांक ०६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०:०० वाजता ते दिनांक ०७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०७:०० वाजताच्या दरम्यान, गोरेगाव येथील फिर्यादी सोमेंद्र छगनलाल पटले (वय ३३ वर्ष, रा. मोहगाव बुज., ता. जिल्हा गोंदिया) यांच्या मोबाईल दुकानाचे शटर अज्ञात चोरांनी लाकडी वा लोखंडी साहित्याने कुलूप-ताळा तोडून आत प्रवेश केला. दुकानामधून वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण ३७ अँड्रॉइड मोबाईल चोरट्यांनी लांबवले.



या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे अपराध क्रमांक ७१३/2026 नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.



पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात चक्र वेगाने फिरली:

मोबाईल दुकानात झालेल्या या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे कठोर निर्देश दिले होते. तसेच अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे विशेष पथक गोरेगाव व डुग्गीपार परिसरात तपासासाठी रवाना करण्यात आले.

तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे लावला छडा:

तपासादरम्यान LCB पथकाला तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यामार्फत पक्की माहिती मिळाली की, ही घरफोडी मौजा म्हसवानी (तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया) येथील एका विधिसंघर्ष बालकाने त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने केली आहे.



पोलिसांनी कसून शोध घेतला असता, सदर विधिसंघर्ष बालक सद्यस्थितीत किन्ही/मोखे (तालुका साकोली, जिल्हा भंडारा) येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे LCB च्या पथकाने किन्ही/मोखे येथे धडक देऊन तिन्ही संशयित विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले.

स्कुल बँगमध्ये लपवले होते मोबाईल:

पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून विचारपूस केली असता, त्यांनी गोरेगाव येथील दुकानाचे शटर तोडून मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले सर्व मोबाईल एका स्कुल बँगमध्ये लपवून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी किन्ही/मोखे येथील एका विधिसंघर्ष बालकाच्या घरातून स्कूल बँग झडती घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण ३७ अँड्रॉइड मोबाईल (किंमत अंदाजे ५,२५,००० रुपये) पंचांसमक्ष जप्त केले.



चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस स्टेशन गोरेगाव करीत आहे.

पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी:

सदर धडाकेबाज यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक  गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक  अभय डोंगरे आणि पोलीस निरीक्षक  रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी अभिषेक जंगमवार, पो.हवा. दिक्षीतकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, तुळशीदास लुटे, भोजराज बहेकार, पो.शि. छगन विठ्ठले, हंसराज भांडारकर, निखिल मेश्राम, चापोशि. राम खंदारे तसेच सायबर सेलचे पो.शि. आकीब काझी आणि श्रेयश लांबट यांनी पार पाडली आहे. गोंदिया पोलिसांच्या या कामगिरीमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले असून व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!