
सोने-चांदीची नाणी स्वस्तात देतो म्हणुन व्यावसायिकास ३० लाखाचा गंडा…
पुणे – आम्हाला गुप्तधन सापडले असून, सोने-चांदीची नाणी स्वस्तात द्यायला आम्ही तयार आहोत, असे आमिष दाखवून चोरट्यांनी बाणेर भागातील एका व्यावसायिकाची ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत एका व्यावसायिकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे बाणेर परिसरात वास्तव्याला असून, त्यांचे औषध विक्रीचे दुकान आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची
आरोपींशी ओळख झाली. त्यावेळी आरोपींनी गोड बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. आपल्याला गुप्तधन सापडल्याची बतावणी त्यांनी केली. या गुप्तधनामध्ये मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची नाणी आहेत. ही नाणी स्वस्तात देण्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. दरम्यान, चोरट्यांच्या बतावणीची व्यावसायिकाला भुरळ
पडली. गुप्तधन स्वस्तात मिळेल या आशेने फिर्यादीने चोरट्यांसोबत ३० लाख रुपयांमध्ये व्यवहार ठरवला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना चाकण भागात बोलावून घेतले. पिशवीत सोन्याची नाणी आहेत. ही
पिशवी लगेच उघडू नका. घरी जाऊन उघडा, असे सांगून चोरट्यांनी त्यांच्याकडून ३० लाख रुपये घेतले. दरम्यान, व्यावसायिक घरी परतल्यावर त्याने पिशवी उघडून पाहिली. पिशवीतील सोन्याच्या नाण्यांची तपासणी केली असता, सर्व नाणी बनावट असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीला धक्काच बसला. त्यानंतर संतप्त झालेल्या व्यावसायिकाने पोलीस ठाण्यात धाव घेतली.




