चारीत्र्याच्या संशयावरून पोटच्या पोरानेच संपविले जन्मदात्या आईला व सख्ख्या भावाला…
मोर्शी(अमरावती)- आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील मोर्शी येथे घडली आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात, संशयातून पोटच्या गोळ्याने, आपल्या आईची आणि भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला
हैदराबाद येथून अटक केली आहे. सौरभ गणेश कापसे (24) रा. शिवाजीनगर, मोर्शी असे आरोपी मुलाचे नाव आहे. शुक्रवार, 1 सप्टेंबर रोजी शिवाजीनगर येथे राहणाऱ्या नीलिमा गणेश कापसे (48) आणि आयुष गणेश कापसे (20) या मायलेकाचे मृतदेह
त्यांच्या राहत्या घरी कुजलेल्या स्थितीत लाकडी दिवाणाच्या कण्यात आढळून आले होते. घटनेच्या दिवसापासून नीलिमा यांचा मोठा मुलगा बेपत्ता होता. त्याचा मोबाइलसुद्धा बंद होता. नीलिमा यांचे आई-वडील कोंढाळी येथे राहतात. ते सातत्याने नीलिमा आणि दोघाही नातूंच्या संपर्कात होते. पाच-सहा दिवसांपासून नीलिमा यांचा मोबाइल बंद दाखवित असल्याने नीलिमा यांचे आई-वडील मोर्शीत पोहोचल्यावर हे धक्कादायक हत्याकांड समोर आले होते.
नीलिमा यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले होते. त्या कंत्राटी तत्त्वावर पंचायत समितीत काम करीत होत्या. सौरभ हा विद्युत अभियांत्रिकी पदविका पूर्ण करून अमरावतीत सार्वजनिक बांधकाम विभागात कंत्राटी तत्त्वावर काम करीत होता. तर आयुष हा अमरावतीत एका महाविद्यालयात शिकत होता. दोघेही भाऊ बराच काळ घराबाहेरच राहत असत. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना, नीलिमा कापसे यांचा मुलगा सौरभला आपल्या आईचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक असल्याचा संशय होता. यामुळे
सौरभने कटकारस्थान रचून आपल्या आई आणि भावाला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने नवीन शक्कल लढवली. आधी खाण्याच्या भाजीमध्ये धोत्र्याच्या बिया टाकल्या. ज्याने आई आणि भावाची प्रकृती खालावली. त्यानंतर दोघांनाही घरी आणून सलाईन लावली. या सलाईनमध्ये गुंगीधारक आणि झोपेचे औषध इंजेक्शनने सलाईनमध्ये सोडले. औषधांच्या अतिडोसमुळे दोघांचाही झोपेतच मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यू झाल्याची खात्री
केल्यानंतर त्याने दोघांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधून दिवाणमध्ये टाकले. घराला बाहेरून कुलूप लावून तो घर सोडून निघून गेला. धक्कादायक म्हणजे आरोपीने हत्या करण्याच्या विविध पद्धतीचा इंटरनेटवर अभ्यास केला. काही वनौषधींच्या अतिसेवनामुळे विषामध्ये रुपांतर होते, अशी माहिती त्याने गोळा केली. या हत्याकांडामुळे सगळेच हादरले आहेत.पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला हैदराबाद येथून अटक केली आहे.